KBC 16 Registrations : `कौन बनेगा करोडपती`मध्ये सहभागी व्हायचं? मग `ही` तारीख नक्की ठेवा लक्षात
`कौन बनेगा करोडपती` या कार्यक्रमामुळे अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होऊ शकणार आहे.
Kaun Banega Crorepati Registration Date : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'कौन बनेगा करोडपती'ला ओळखले जाते. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचे 16 वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. आता नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे.
नुकतंच सोनी टीव्ही वाहिनीने इन्स्टाग्रामवर 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या कार्यक्रमाचे 16 वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रोमोद्वारे वाहिनीने प्रेक्षकांना केबीसीच्या 16 व्या पर्वासाठीची नोंदणी कधीपासून सुरु होईल, याबद्दलची माहिती दिली आहे. या व्हिडीओत अमिताभ बच्चन हे भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर गेल्या कार्यक्रमातील काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रियाही यात दिसत आहे. यानंतर अमिताभ बच्चन हे स्वत: या पर्वाची नोंदणी कधीपासून सुरु होईल, याची माहिती देताना दिसत आहेत.
26 एप्रिलपासून नोंदणीला सुरुवात
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची नोंदणी प्रक्रिया येत्या 26 एप्रिलला रात्री 9 वाजल्यापासून सुरु होणार आहे. पण केबीसीचे यंदाचे पर्व किती तारखेपासून सुरु होणार, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आता टीव्ही 9 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे 16 वे पर्व सुरु होण्यासाठी प्रेक्षकांना थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 5 ऑगस्ट 2024 पासून सुरु होईल, अशी माहिती समोर येत आहे. पण अमिताभ बच्चन किंवा वाहिनीने याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या 16 व्या पर्वाचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निर्मात्यांकडूनही स्पर्धकांची निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या स्पर्धकांसोबत या कार्यक्रमाचे शूटींग केले जाईल. यानंतरच या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती टीव्ही 9 हिंदीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
दरम्यान 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमामुळे अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होऊ शकणार आहे. यामुळे अनेक चाहते आणि प्रेक्षक हे 26 एप्रिल म्हणजे नोंदणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा कार्यक्रम कधीपासून सुरु होणार याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.