`डोंबाऱ्याचं खेळ करणाऱ्या आज्जीला मदत करा; पण...`
`लाज वाटायला हवी..` केदार शिंदे यांनी व्यक्त केला संताप
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून डोंबाऱ्याचा खेळ करण्याऱ्या आज्जींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या नातवंडांची भूक भागवण्यासाठी या आजी डोंबाऱ्याचे खेळ करून कुटुंबाचं पोट भरतात. आयुष्याच्या उतार वयात देखील ज्या सफाईनं आज्जीबाई काठी चालवत आहेत ते पाहून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवाय त्यांच्या मदतीसाठी अनेक हात देखील पुढे येत आहेत.
परंतु, त्यांची मदत करत त्यांना पुन्हा तेच काम करण्यासाठी सांगणाऱ्यांवर दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच संतापले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'त्या आजीचा व्हिडीओ गाजतोय. चहूबाजूनं मदत जाहीर होतेय. काहीतर लागलीच पोहोचून मदत करतायेत. करायलाच हवी. पण त्या मदतीचे व्हिडीओ काढणं आणि आजीला पुन्हा तेच तेच करून दाखवायला लावणं किती संयुक्तिक आहे? लाज वाटायला हवी,” असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.
ण्याच्या हडपसर परिसरात राहणारी ही आजी डोंबाऱ्याचा खेळ करते. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील कुटुंबातील १७ जण उपाशी राहू नये म्हणून ही आजी आपल्या नातवंडांसाठी थरारक कामगिरी करत आहे.
या आज्जीबाईंना मदत करण्यासाठी अनेकजण भावनिक झाले आहेत. त्याचप्रमाणे कलाविश्वातील अनेकांनी त्यांना मदत देखील केली. प्रत्येक जण त्यांना आपल्या परीनं मदत करताना दिसत आहे.