त्रिसूर : शबरीमला मंदिराचा वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरत असून, याच वादाविषयी फेसबुक पोस्ट लिहिणं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट दिग्दर्शकाला महागात पडलं आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून नावारुपास आलेल्या प्रियनंदन यांच्यावर त्रिसूर जिल्ह्यातील राहत्या घरापाशी हल्ला करण्यात आला. शुक्रवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हा हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५२ वर्षीय दिग्दर्शक प्रियनंदन हे वल्लचिरा येथील त्यांच्या घरापाशी असणाऱ्या एका दुकानात जात होते. त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावत त्यांच्यावर शेणाने भरलेली एक बादली ओतली. आजूबाजूच्या लोकांच्या हा प्रकार लक्षात येण्याआधीच ती व्यक्ती पसार झाल्याचं लक्षात आलं. 


''तो म्हणाला, 'अय्यप्पाच्या विरोधात बोलणारा तू आहेस तरी कोण, ही तर फक्त एक सुरुवात आहे.' उजव्या कानशिलात लगावल्यानंतर त्याने शेण आणि पाण्याचं मिश्रण असणारी एक बादली माझ्यावर ओतली. आजूबाजूचे लोक तेथे गोळा होण्यापूर्वीच त्या व्यक्तीने तेथून पळ काढला होता'', असं प्रियनंदन म्हणाल्याचं वृत्त 'इंडियन एक्प्रेस'ने प्रसिद्ध केलं आहे. त्या व्यक्तीला आपण यापूर्वीही या परिसरात पाहिलं असून तो नेमका आरएसएसचा कार्यकर्ता आहे की भाजपाचा हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. आपल्यावर झालेल्या या हल्ल्यात एकाहून अधिक व्यक्तींचा हात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 


प्रियनंदन यांनी हल्ला झाल्यानंतर डॉक्टरांची मदत घेतली आणि संबंधित प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर एका पोलिस पथकाने दिग्दर्शकाच्या घराच्या दिशेने धाव घेत त्यांचा जबाब नोंदवला. ज्या मदतीने आता ते पसार झालेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. 



प्रियनंदन यांनी शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा अधोरेखित करत एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी वापरलेली भाषा अनेकांनाच खटकली असून, त्यांच्यावर बऱ्याचजणांचा रोष ओढावला होता. हा सारा विरोध पाहता कालांतराने प्रियनंदन यांनी ती पोस्ट डिलीटही केली होती. इतकच नव्हे तर, याच विरोधाचा एक भाग म्हणून त्यांच्या घरी भाजपा कार्यकर्त्यांनी मोर्चाही नेला होता.


या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री म्हणतात...


प्रियनंदन यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे. प्रियनंदन यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळाली असून, त्यांना काही धमक्याही मिळाल्या होत्या, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'केरळ राज्यात वाढत चालणाऱ्या असहिष्णुतेचीच ही लक्षणं आहेत. आज जे काही घडलं त्याची पडताळणी करण्याची गरज आहे. अशा घटना आणि हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत', असं विजयन म्हणाले. 


कोण आहेत प्रियनंदन? 


प्रियनंदन हे त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. २००६ मध्ये 'पुलीजन्मम' या त्यांच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. समाजातील घडामोडी, परिणामकारक खटक, समाजवाद या साऱ्यावर भाष्य करणाऱ्या त्यांच्या चित्रपटांना नेहमीच केरळ आणि केरळबाहेरी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.