Box office collection: `केसरी`ची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री
`केसरी`ने `गली बॉय` आणि `टोटल धम्माल` चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
मुंबई : देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या २१ जवानांवर आधारित असलेल्या 'केसरी' चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच दमदार ओपनिंग केलं होतं. आता 'केसरी' या वर्षातील विक्रमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'केसरी'ने यंदाच्या वर्षातील सर्वात लवकर शंभर कोटींचा टप्पा पार करणारा चित्रपट ठरला आहे. 'केसरी'ने रणवीर सिंहच्या 'गली बॉय' आणि अजय देवगणच्या 'टोटल धम्माल' चित्रपटालाही मागे टाकलं आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी शंभर करोड क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने आपल्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाचे आकडे शेअर केले आहेत. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २१.०६ कोटी रूपयांची बंपर ओपनिंग केली. शुक्रवारी १६.७० कोटी, शनिवारी १८.७५, रविवारी २१.५१ हून अधिक आणि सोमवारी ८.२५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. परंतु मंगळवारनंतर चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागला. कमाईचा वेग मंदावला असला तरी चित्रपटाने ७ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली. आता चित्रपटाची कमाई १००.०१ कोटी रूपयांवर पोहचली आहे.
चित्रपटाची बॉक्सऑफिस ओपनिंग पाहता ५ दिवसांतच १०० कोटी टप्पा पार करेल असा अंदाज होता. परंतु आयपीएल सुरू झाल्यानंतर बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली. आयपीएलचा परिणाम आगामी 'नोटबुक', 'गॉन केश' आणि 'जंगली' चित्रपटांवरही होऊ शकतो. दरम्यान, अक्षय कुमारची प्रसिद्धी आणि त्याचा चाहतावर्ग पाहता 'केसरी' बॉक्सऑफिसवर आणखी कमाई करू शकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१२२ सालांपूर्वी २१ शिखांनी १० हजार अफगाणांशी लढाई केली होती. केसरी चित्रपट १८९७ मध्ये १२ सप्टेंबर रोजी सारागढी येथे झालेल्या लढाईवर आधारित आहे. सारागढीतील या २१ शिखांना इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.