सणावारांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांवर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत, पुन्हा म्हणतेय...
केतकीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
मुंबई : सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा केतकी तिनं शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यावेळी आपण कशाप्रकारे शुभेच्छा दिल्या पाहिजेत हे केतकीनं सांगितलं आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे केतकी यावेळीही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
केतकीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत केतकी म्हणाली की 'प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका. आपण जेव्हा हॅप्पी लिहितो तेव्हा शुभेच्छा आणि हॅप्पी या दोन्ही शब्दांमध्ये खूप अंतर आहे हे समजून घेण्याची गरज आहे. असे काही करुन आपण आपल्या धर्मामध्ये अंतर निर्माण करु नये.'
केतकीनं आपल्या पोस्टमधून 'शुभेच्छा देताना आपण जे इमोजी वापरतो ते चीनमध्ये नववर्षासाठी वापरला जातो असे देखील म्हटले आहे. त्यामुळे आपण तो वापरताना काळजी घ्यावी' असे केतकीनं आणखी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे 41 दिवस तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेयादेशीर होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर केतकीने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती.