दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपची मुलगी सानवी सुदीपने (Sanvi Sudeep) आपली आजी सरोजा संजीव (Saroja Sanjeev) निधनानंतर अमानवीय वागणाऱ्या लोकांप्रती नाराजी व्यक्त केली आहे. सरोजा संजीव यांचं रविवारी निधन झालं. आपली आजी सरोजा संजीव (Saroja Sanjeev) यांचं निधन होणं त्या दिवसातील सर्वात वाईट गोष्ट नव्हती, तर आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर कऱणं होती अशा शब्दांत तिने खंत व्यक्त केली आहे. 


'लोक ढकलत होते, ओढत होते'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानवीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या आजीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. आपल्या आजीच्या निधनावर शोक व्यक्त करत तिने लिहिलं आहे की, 'मी तुझ्यावर नेहमी आणि कायम प्रेम करत राहीन'. यानंतर तिने एक सविस्तर पोस्ट लिहिली असून त्यात कशाप्रकारे काही लोकांनी आजीच्या अंत्ययात्रेत बाधा आणली हे सांगितलं आहे. त्यांना आमच्या वेदनांपेक्षा रिलची जास्त चिंता होती असा संतापही तिने व्यक्त केला आहे. 


तिने लिहिलं आहे की, "आज आमच्या कुटुंबासाठी फार कठीण दिवस होता. पण माझ्या आजीला गमावणं हा सर्वात वाईट भाग नव्हता. घराबाहेर जमा झालेले लोक जोरजोरात ओरडत होते, मी रडत असताना तोंडावर कॅमेरा आणत होते. लोक इतके अमानवीय कसे होऊ शकतात हे समजत नाही".


जमलेल्या गर्दीमुळे आम्ही आमच्या आजीला हवा तसा निरोप देऊ शकलो नाही अशी खंतही तिने मांडली आहे. तिने सांगितलं आहे की, "जेव्हा माझे वडील त्यांच्या आईसाठी रडत होते तेव्हा लोक ढकलत, ओढत होते. तिला अपेक्षित असणाऱा अखेरचा निरोप देताना आम्हाला इतका त्रास सहन करावा लागला. इथे मी माझ्या प्रिय व्यक्तीला गमावल्याने रडत असताना, ते सर्व लोक रिलची चिंता करत होते".



सरोजा संजीव यांचं निधन


सरोजा यांचं रविवारी सकाळी वृद्धापकाळातील आजारांमुळे निधन झालं. बंगळुरूमधील जयनगर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव जेपी नगर येथील सुदीप यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं होतं, जेणेकरून लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतील. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार बसवराज बोम्मई यांच्यासारखे राजकारणी आणि शिवा राजकुमार सारख्या सेलिब्रिटींनी शोक व्यक्त करण्यासाठी सुदीपला भेट दिली.