किशोर कुमार यांच्या कॉलेज आणि मैत्रीचे किस्से, जे तुम्हाला माहिती नसतील !
मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये राहणा-या बंगाली कुटुंबात जन्मलेले किशोर कुमार केवळ एक चांगले माणूस आणि गायकच नव्हते, तर मैत्री निभावण्यातही त्यांची कुणी बरोबरी करु शकत नव्हते.
मुंबई : मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये राहणा-या बंगाली कुटुंबात जन्मलेले किशोर कुमार केवळ एक चांगले माणूस आणि गायकच नव्हते, तर मैत्री निभावण्यातही त्यांची कुणी बरोबरी करु शकत नव्हते.
किशोर कुमार यांनी त्यांचं कॉलेजच शिक्षण इंदोरच्या क्रिश्चियन कॉलेजमधून केलं होतं. किशोर कुमार हे कॉलेजमध्ये आल्यानंतरही मस्ती आणि दोस्तांमध्ये व्यस्त राहत होते. त्यामुळे गायकीत सर्वांना मागे सोडणा-या किशोर कुमार यांना कॉलेजमध्ये दोन वर्ष एकाच क्लासमध्ये रहावं लागलं होतं. त्यानंतर तिस-या प्रयत्नात त्यांनी परिक्षा उत्तीर्ण केली होती.
मैत्रीच्या बाबतीत किशोर कुमार यांना खूप मानलं जायचं. आपल्या मित्रांसाठी ते कोणतीही रिस्क घेत होते. एकदा एका कॉलेज कार्यक्रमात किशोर कुमार यांनी त्यांच्या मित्रासाठी स्टेजच्या मागे उभे राहून गाणं गायलं होतं. आणि त्यांचा मित्र स्टेजवर केवळ लिपसिंग करत होता.
काही लोक म्हणतात की, प्रसिद्ध गायक झाल्यानंतर अनेक स्टेज शो करणारे किशोर कुमार यांना स्टेजची भीती वाटायची. त्यामुळेच ते कॉलेजमध्ये आपल्या मित्रांसाठी स्टेजच्या मागे उभे राहून गात होते. असे मानले जाते की, त्यांचा हा लिपसिंगचा फंडा त्यांच्या ‘पडोसन’ या सिनेमात त्यांच्यामुळे वापरण्यात आला होता. या सीनमध्ये किशोर कुमार हे सुनील दत्त यांच्यासाठी मागे राहून गाणं गातात. आणि सुनील दत्त केवळ लिपसिंग करत होते.
तसा त्यांचा कॉलेज जीवनातील आणखी एक किस्सा आहे. जो त्यांनी इंडस्ट्रीत आल्यावर एका गाण्यात जोडला होता. क्रिश्चियन कॉलेजमध्ये एका चिंचेच्या झाडाखाली आरामात आपल्या मित्रांची चंपी करत होते. चंपी करताना बोलल्यावर ज्याप्रकारचे शब्द ऎकायला येतात. ते शब्द आठवून त्यांनी तेच शब्द ‘झुमरु’च्या टायटल सॉंगमध्ये वापरले होते.
मोहम्मद रफी यांना करावा लागला होता किशोर कुमार यांचा बचाव
किशोर कुमार आणि मोहम्मद रफी हे दोघेही गायकीचे सम्राट होते. मात्र त्यांच्या कोणत्याही प्रकारची स्पर्धा नव्हती. उलट त्यांच्या मैत्रीचे किस्से प्रत्येकाच्या तोंडून ऎकायला मिळत होत्या. एकदा संजय गांधी किशोर कुमार यांच्यावर खूप नाराज झाले होते. त्यांना मनवण्यासाठी आणि किशोर कुमार यांना संजय गांधींच्या रागापासून वाचवण्यासाठी स्वत: मोहम्मद रफी हे संजय गांधींना भेटले होते.