Koffee With Karan Chandrachur Singh Vs Salman Khan: अभिनेता चंद्रचूड सिंग हा 90 च्या दशकामधील बॉलिवूडचा चॉकलेट हिरो होता. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांमधून आपल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेला आणि अचानक पडद्यापासून दूर झालेला हा अभिनेता पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या करिअरमध्ये सर्वोच्च स्तरावर असताना चंद्रचूडने अनेक भूमिका नाकारल्या. यापैकीच एक चित्रपट म्हणजे 'कुछ कुछ होता है'. करण जोहर दिग्दर्शित 1998 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटामध्ये सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. सलमानने या चित्रपटामध्ये अमनची भूमिका साकारली होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भूमिका आधी चंद्रचूड सिंगला ऑफर करण्यात आली होती. मात्र त्याने ही भूमिका नाकारली होती.


सलमान काय म्हणालेला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रचूड सिंगने सलमानच्या खानचा दावा चुकीचा ठरवला आहे. 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सलमानने केलेल्या एका दाव्यामुळे चर्चेत आला आहे. 'कुछ-कुछ होता है'च्या निर्मितीच्या वेळेस चंद्रचूड सिंग बेरोजगार होता तरी त्याने चित्रपट नाकारला, असं सलमान म्हणाला होता. 


सलमानला म्हणाला खोटारडा


'रेडिट'वरील एका यूझरने केलेल्या दाव्यानुसार चंद्रचूडने सलमान खानने केलेल्या या दाव्यांवर प्रतिक्रिया नोंदवली. चंद्रचूडने नोंदवलेल्या प्रतिक्रियांचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये चंद्रचूडने सलमान खानला खोटारडा म्हटलं आहे. "हे सलमानचं खोटं विधान आहे," असं चंद्रचूडने पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावर एका चाहत्याने यात नेमकं खोटं काय आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर चंद्रचूडने, "असं काहीही नव्हतं की त्यावेळेस माझ्याकडे काम नव्हतं. मी बेरोजगार होतो असा दावा सलमानने केला असला तरी तो चुकीचा आहे. त्यावेळेस माझ्याकडे 'जोश','दाग द फायर','क्या हना','सिलसिला है प्यार का' यासारखे चित्रपट होते. मी यामधून मला योग्य वाटेल तो पर्याय निवडला," असं म्हटलं होतं. चंद्रचूडने नंतर हे सर्व ट्वीट डिलीट केले.


नेमकं सलमान आणि करण जोहरमध्ये काय बोलणं झालं?


मागील आठवड्यामध्ये 'कॉफी विद करण' या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये करण जोहरने 'कुछ कुछ होता है'मधील सेकेण्ड लीडच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांना विचारण्यात आल्याचा खुलासा केला. यामध्ये सैफ अली खान आणि चंद्रचूड सिंग यांचाही समावेश होता. मात्र शेवटी ही भूमिका सलमान खानने साकारली. 'कॉफी विद करण' कार्यक्रमामध्ये सलमान खान पाहुणा म्हणून आला होता. त्यावेळी 'कुछ कुछ होता है'मधील भूमिकेबद्दल गप्पा मारताना करण जोहरने अमनच्या भूमिकेसाठी नट शोधताना फार कष्ट घ्यावे लागल्याचं म्हटलं. करणचं बोलणं ऐकून सलमान खानने, "चित्रपटामध्ये शाहरुख खानला भूमिका देणं तुला अडचणीचं वाटलं नाही. मात्र अमन च्या भूमिकेसाठी तुला कष्ट घ्यावे लागले कारण तेव्हा सैफ अळी खान काहीच करत नव्हता आणि चंद्रचूडलाही काही ररायचं नव्हतं. तरीही त्याने नकार दिला. मी मात्र होकार दिला. मी पहिल्यांदा तुझ्यातलं टॅलेंट हेरलं करण. मात्र त्यानंतर तू कधीच माझ्याबरोबर काम केलं नाही," असा चिमटा काढला. 


...म्हणून नाकारलेली भूमिका; समोर आलं खरं कारण


मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये चंद्रचूडने करण जोहरकडून मला अमनचा रोल ऑफर करण्यात आल्याचं म्हटलं होतं. मात्र आपल्याला त्यावेळी ती भूमिका पसंत पडली नव्हती. त्याचं आता आफल्याला वाईट वाटतंय, असंही चंद्रचूडने म्हटलेलं.