मुंबई : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. श्रीदेवींच्या आयुष्यावर आधारलेल्या 'श्रीदेवी : एटरनल स्क्रिन गॉडेस' या पुस्तकाचं लेखन लेखक सत्यार्थ नायक यांनी केलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा उलगडा करण्यात आला आहे. पण त्यांच्या अचानक जाण्यामुळे लेखकाच्या मनातले अनेक प्रश्न त्यांच्या मनातच राहिले. त्यामुळे याविषयी त्यांच्या मनात खंत अजूनही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या आयुष्यावर लेखन करण्यापूर्वी लेखकाला श्रीदेवींसोबत संवाद साधायचा होता. पण त्यांना तसे करता आले नाही. यासंदर्भातील खुलासा लेखकाने आईएएनएससोबत बोलताना केला आहे. ते म्हणाले Penguin Random House कडून मंजूरी मिळाल्यानंतर माझं बोलणं बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यासोबत झालं होतं. असं नायक म्हणाले. 


पण त्यावेळी श्रीदेवी त्यांची मुलगी जान्हवीच्या आगामी चित्रपटात व्यस्त होत्या. म्हणून जान्हवीच्या पदार्पणानंतर त्या माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार होत्या, असं नायक यांनी सांगितलं. त्यावेळी जान्हवी 'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. 


पण २४ फेब्रुवारी २०१८ साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे लेखक सत्यार्थ नायक यांना अत्यंत दु:ख झालं होतं. अखेर ७० कलाकारांना भेटून लेखकाने श्रीदेवींच्या आयुष्यावर आधारित 'श्रीदेवी : एटरनल स्क्रिन गॉडेस' पूस्तकाचे लिखाण पूर्ण केले. 


श्रीदेवींनी त्यांच्या कारकिर्दित एकापेक्षा एक हीट चित्रपटं दिली आहेत. 'सोलहवां सावन', 'मिस्टर इंडिया', 'सदमा', 'चांदनी', 'नगीना' आणि 'हिम्मतवाला' या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका रंगवल्या होत्या. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले होते. त्यांच्या निधनाला २४ फेब्रुवारी रोजी दोन वर्ष पूर्ण होतील.