`आज लक्ष्मीकांत असते तर...`, लेकीच्या सिनेसृष्टीतील पदार्पणावर प्रिया बेर्डे भावूक
जर आज लक्ष्मीकांत बेर्डे तर त्यांनी लेकीच्या पदार्पणावर काय प्रतिक्रिया दिली असती, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले.
मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांना ओळखले जाते. त्यांनी मराठीबरोबरच बॉलीवूड चित्रपटातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे ही सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच याबद्दल स्वानंदीची आई प्रिया बेर्डे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असती, याबद्दलचाही खुलासा केला आहे.
स्वानंदी बेर्डेने आतापर्यंत अनेक नाटक आणि एकांकिकेत अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आता लवकरच तिचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन येड्यागत झालं’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वानंदीबरोबर अभिनेता सुमेद मुगदलकरची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचवेळी प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना जर आज लक्ष्मीकांत बेर्डे तर त्यांनी लेकीच्या पदार्पणावर काय प्रतिक्रिया दिली असती, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले.
"लक्ष्मीकांत बेर्डे असते तर..."
"जर आज लक्ष्मीकांत असते, तर मुलं सिनेसृष्टीत करिअर करतात, हे पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असता. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या आणि शिट्ट्याही वाजवल्या असत्या. त्याबरोबरच त्यांनी काही सूचनाही केल्या असता", असे प्रिया बेर्डेंनी म्हटले.
"मी त्यांना काहीही सूचना करत नाही"
यापुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या, "मी त्यांना कधीही कोणत्याही सूचना देत नाही. मी त्यांच्यासोबत सेटवरही जात नाही. कारण जसं सोनाराचं मूल सोनार होतं, तसं कलाकाराचं मूल कलाकार झालेलं आहे आणि त्याला काय करायचं हे माहिती आहे. त्यामुळे ते दोघेही त्यांच्या अनुभवातून शिकतील. मला आज ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात, त्या गोष्टी कदाचित त्यांना बरोबर वाटत असतील. त्यामुळे मी त्यांना या गोष्टी सांगत नाही. त्यांनी त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या कष्टाने मोठं व्हावं."
"स्वानंदी ही चांगली अभिनेत्री आहे. तिच्यात पहिल्यापासूनच त्या गोष्टी आहेत. पण त्याची तिला जाणीव नव्हती. तू आणि दादा करतोस ते ठीक आहे. मी दुसरं काही तरी करेन, असं ती अनेकदा म्हणायची. तिला योगेशने एकदा विचारलं. ती म्हणाली, मी काय करु? मी तिला म्हटलेलं तू करुन बघ. तिचा पहिला चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता दुसरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे", असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान ‘मन येड्यागत झालं’ या चित्रपटात स्वानंदी बेर्डे, अभिनेता सुमेद मुगदलकर, अभिनेत्री श्वेता परदेशी हे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केले आहे. संदीप पांडुरंग जोशी, कुणाल दिलीप कंदकुर्ते आणि ‘श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन’ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. निलेश पतंगे यांनी या गाण्यांना संगीत दिले असून या गाण्यांना जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, निलेश पतंगे यांचा आवाज लाभला आहे. येत्या 1 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.