ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार `हे` सिनेमे
`गुलाबो सिताबो` पाठोपाठ प्रदर्शित होणार आणखी सात सिनेमे
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून सिनेमागृह बंद ठेवण्यात आले आहेत. अशातच फिल्ममेकर्सने आपले रखडलेले सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्यान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
येत्या काही काळात बॉलिवूडमधील सात सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या डिझ्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहेत. या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या सिनेमात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 'दिल बेचारा', अजय देवगनचा 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया', अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब', अभिषेक बच्चन 'द बिग बुल' आणि आलिया भट्टचा 'सडक २', कुणाल खेमूचा 'लूटकेस' आणि विद्युत जामवालचा 'खुदा हाफिज' सारखे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. अनलॉक १ करून काही गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. पण यामध्ये सिनेमागृह आणि मॉल्सच्या नियमांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. सध्या या गोष्टी बंदच राहणार आहेत.
आलिया भट्टच्या 'सडक २' च्या सिनेमाचं काही दिवसांच शुटिंग बाकी आहे. याच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. अशा परिस्थितीत डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. अक्षय कुमार म्हणतो की, '२० वर्षाच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा इतके दिवस घरी आहे. एवढ्या दिवसांत मी आणि डेविड धवन यांनी दो-तीन सिनेमे नक्कीच केले असते. पण या दिवसांच पण महत्व आहे. ये जिंदगी न मिलेगी दोबारा'
अभिनेत्री विद्या बालनचा 'शकुंतला देवी' आणि जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला 'गुंजन सक्सेना' हा बायोपिक 'ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ' वर प्रदर्शित होणार आहे.