गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, करीना आणि करिश्मा कपूर यांनाही विशेष जबाबदारी!
अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार असल्याचे माहिती समोर आली आहे.
Govinda Ahuja Join Eknath Shinde Shivsena : 90 च्या दशकातील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून गोंविदाला आळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकीय इनिंग सुरु करणार असल्याचे बोललं जात होतं. अखेर अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश करत शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. गोविंदाला यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे तिकीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. तर अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार असल्याचे माहिती समोर आली आहे
काही आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. येत्या 19 एप्रिलला महाराष्ट्रातील पहिल्या 6 जिल्ह्यात मतदान पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता अभिनेता गोविंदाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतरच गोविंदा हा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात होतं. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत गोविंदाचा पक्षप्रवेश झाला.
अभिनेता गोविंदाची प्रतिक्रिया
यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी गोविंदाचे शिवसेनेत स्वागत केले. "आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्रदिनी लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांचे मी शिवसेनेत स्वागत करतो. त्यांचे मनापासून अभिनंदन. ते अतिशय डाऊन टू अर्थ आहेत. ते स्टार प्रचारक म्हणून काम करतील. मला कोणतेही निवडणुकीचे तिकीट नको आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे", असे एकनाथ शिंदे यावेळी सांगितले. त्यासोबतच गोविंदाने पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंचे आभार मानले. "नमस्कार, प्रणाम, जय महाराष्ट्र. मी आदरणीय एकनाथ शिंदेंचे आभार मानतो. आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे, ही देवाचीच मिळालेली कृपा आहे. मी 2004 ते 2009 या काळात सक्रीय राजकारणात होतो. त्यानंतर जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा मला वाटलं होतं की पुन्हा कधीच राजकारणात येणार नाही. पण 2010 ते 2024 या 14 वर्षाच्या वनवासानंतर रामराज्य ज्या पक्षात आहे, तिथेच त्याच पक्षात एकनाथ शिंदेंच्या कृपेने या पक्षात आलोय. मी त्यांचे आभार मानतो", असे गोविंदा म्हणाला.
अमोल किर्तीकरांविरोधात गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात
अभिनेता गोविंदाच्या पक्षप्रवेशानंतर तो उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गजानन किर्तीकर यांचं वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, याच पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता महायुतीकडूनही या जागेवर चर्चेतील चेहरा देण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी अभिनेता गोविंदाचे नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांकडून सेलिब्रिटी मंडळींनाही मोठी संधी दिली जात असल्याचे बोललं जात आहे. काही सिनेकलाकार हे विविध पक्षांचे स्टार प्रचारक देखील असण्याची शक्यता आहे. महायुतीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांची नाव असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान याआधीही 2004 मध्ये गोविंदाने काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्याने भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता.