`धर्मवीर चित्रपटात जे दाखवलं ते खोटं, आम्ही आता...`, एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केला खुलासा
Eknath Shinde on Rajan Vichare: धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात राजन विचारे (Rajan Vichare) यांच्याबद्दल जे दाखवलं, ते खोटं होतं असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दुसऱ्या भागात आपण सगळं खरं दाखवणार आहोत असंही ते म्हणाले आहेत.
Eknath Shinde on Rajan Vichare: धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात राजन विचारे (Rajan Vichare) यांच्याबद्दल जे दाखवलं, ते खोटं होतं असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दुसऱ्या भागात आपण सगळं खरं दाखवणार आहोत असंही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंना ना धनुष्यबाण पाहिजे ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे त्यांना फक्त पैसे, संपती पाहिजे असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसैनिकांच्या खात्यातील 50 कोटी त्यांनी काढून घेतले असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
"आनंद दिघेंनी मला उभं केलं. ते माझ्या पाठीशी उभे राहिले. पण राजन विचारेंबाबत सिनेमात दाखवलं ते खोटं होतं. राजन विचारे स्वत:हून आले आणि राजीनामा दिला असं काही नव्हतं. दुसऱ्या सिनेमात आम्ही सगळं दाखवणार आहे. आनंद दिघे यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला नाही. हे काय चालू आहे. माझं पद काढून घेत आहेत अशी विचारणा केली. तो दिघे साहेबांना नको ते बोलला. मी शेवटी साहेबांना असं करु नका सांगितलं. मग साहेबांनी त्याला बोलवलं आणि आपल्या भाषेत, आतल्या खोलीत समजावलं. आम्ही चित्रपटात उलट, चांगलं दाखवलं," असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे राजन विचारे निवडून येत होते. ते साधा वडापावही देत नव्हते असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.
नरेश म्हस्के हे आनंद दिघेंचे खरे शिष्य आहेत. राजनचा सीजन आता संपला असून नरेशचा विजय होईल चांगला असंही ते म्हणाले. अनेकजण बोलले यांचं काम करणार नाही. काम नाही केलं तर माझ्याशी गाठ आहे. एकनाथ शिंदे उमेदवार आहे असं समजून तुम्हाला काम करायचं आहे असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नरेश म्हस्के तुम्हाला बदलावं लागेल. खासदार झाल्यावर नगरसेवक आमदार यांच्या कोणत्याही कामात आडकाठी आणायची नाही अशा कानपिचकया त्यांनी काढल्या.
'आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे संपत्तीबद्दल विचारत होते'
दिघे साहेब गेल्यानंतर मी उद्दव ठाकरेंना भेटलो तेव्हा त्यांनी संपत्तीची विचारणा केली असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. "उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याची वेळ आली तेव्हा दिघे साहेबांनी राज ठाकरे यांना पद द्या असं सुचवलं होतं. दिघे साहेबांना मानसिक त्रास झाला होता. दिघे साहेब गेल्यानंतर मी उद्दव ठाकरेंना भेटलो तेव्हा त्यांची संपत्ती कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली. तो फकीर माणूस, दोन हाताने सगळं वाटणार त्यांची काय संपत्ती असणार. मला त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत असं वाटलं, पण नाईलाजाने काम करावं लागलं," अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंना ना धनुष्यबाण पाहिजे ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे त्यांना फक्त पैसे पाहिजे संपती पाहिजे.शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसैनिकांच्या खाय्ताील 50 कोटी काढून घेतले असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
2019 ला मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्हाला काहीही करुन मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुमचं आधीच सगळं ठरलं होतं. फडणवीसांनी 50 वेळा फोन केला, मात्र त्यांनी एकही उचलला नाही. अमित शाह यांनी बंद दाराआड काहीच चर्चा झाली नसल्याचं सांगितलं होतं. यांनी आपली माणसं, सोन्यासारखा पक्ष गमावला आहे अशी टीका त्यांनी केली.
"ठाणे मिळणार नाही असं तुम्हाला वाटत होतं. पण मी वरिष्ठ पातळीवर ठाणे आमची भावना, आनंद दिघेंच्या संवेदना आहेत. तो एक मतदरासंघ म्हणून महत्वाचा नाही असं सांगितलं होतं. मी मोठा कार्यक्रम केला तेव्हा मी माझं काम केलं असून आता तुम्ही तुमचं काम करा असं सांगितलं. नरेंद्र मोदी, अमित शाह ताकदीने पाठीशी उभे राहिले," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.