डॉ. श्रीराम लागूंना श्रद्धांजली दिल्यानंतर माधुरी दीक्षित ट्रोल
अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ.लागू यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर तिला सोशल मीडियात ट्रोल करण्यात येत आहे.
मुंबई : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. १७ डिसेंबरला पुण्यात त्यांचे निधन झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी डॉ. लागू यांना श्रद्धांजली वाहिली. पण अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ.लागू यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर तिला सोशल मीडियात ट्रोल करण्यात येत आहे. माधुरी दिक्षीतने डॉ. लागू यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबरला श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.
'आताच मी डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाबद्दल ऐकले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो !' असे ट्विट तिने आपल्या अकाऊंटवरून केले. या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. 'तुम्ही खूप स्लो आहात मॅडम' असे एका युजरने म्हटले. 'तिसऱ्या दिवशी तुम्हाला समजलं का ?' असा प्रश्न देखील एका युजरने उपस्थित केला. असे असताना काही युजर्स माधुरीच्या पाठीशी देखील उभे राहिले. माधुरी कामात व्यस्त असतात. त्या २४ तास ट्विटरवर उपलब्ध राहू शकत नाहीत, असे त्या युजर्सने म्हटले. तर अनेक युजर्सनी ट्विटवर डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली.
आज अंत्यसंस्कार
नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अंत्यसंस्करापूर्वी डॉ लागू यांचं पार्थिव पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. डॉ.लागू यांचं मंगळवारी निधन झालं.
डाँ. लागू यांचे पुत्र विदेशात होते. ते गुरुवारपर्यंत पोहोचू शकत नसल्याने त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं रूपवेध प्रतिष्ठान तर्फे कळवण्यात आलं होतं. डॉ लागू यांचं नाट्य तसेच सिने क्षेत्रात मोठं योगदान आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुभाष देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ लागू यांचे चाहते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
श्रीराम लागू दीर्घकाळापासून आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. १६ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेल्या डॉ. लागू यांनी मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. ते एक ईएनटी सर्जन (ENT Surgeon) होते. डॉ. लागू यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखलं जातं.