बॉक्स ऑफिसवर `भूल भुलैय्या`ची सिंघम अगेनशी टक्कर; माधुरी स्पष्टच बोलली, म्हणाली `तुम्ही प्रेक्षकांना...`
Madhuri on Clash Between Bhool Bhulaiyaa and Singham Again: कोणता चित्रपट आपल्याला आवडला आहे, आणि कोणता चित्रपट पाहायचा याचा निर्णय प्रेक्षकच घेतील असं माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit ) म्हटलं आहे.
Madhuri on Clash Between Bhool Bhulaiyaa and Singham Again: दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असणारा 'भूल भुलैय्या 3' आणि दुसरीकडे अजय देवगण, करीना कपूर यांच्यासह कलाकारांची फौज असणारा 'सिंघम अगेन' हे दोन्ही चित्रपट आमने-सामने आहेत. यादरम्यान माधुरीने Pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही चित्रपटांमध्ये होणाऱ्या संघर्षावर भाष्य केलं आहे. तसंच 'भूल भुलैय्या 3' कडून असणाऱ्या अपेक्षांबद्दल सांगितलं आहे. आम्ही एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी फार मेहनत घेतल्याचं तिने सांगितलं आहे.
दोन चित्रपट एकत्र रिलीज होण्यासंदर्भात सांगताना माधुरीने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अशा अनेक घटनांना सामोरं गेल्याचं सांगितलं, ती म्हणाली की, "याआधी भूतकाळातही असं घडलं आहे. मला नेमकं आठवत नाही पण दिल किंवा बेटा दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले होते. आताप्रमाणे तेव्हाही दोन्ही चित्रपटांमध्ये मोठी स्टारकास्ट आणि सर्व काही होतं. दोन्ही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे नक्की काय होईल हे तुम्हाला माहिती नाही. हे सर्व प्रेक्षकांवर अवलंबून आहे. कोणता चित्रपट आवडला आणि कोणता पाहायला आवडेल हे प्रेक्षकांनाच ठरवायचं असतं".
पुढे ती म्हणाली, "चित्रपटगृहामध्ये अंतिम परीक्षा असते. तिथेच सर्व काही होणार आहे. त्यामुळे आपण फक्त सर्वोत्तम गोष्टीची अपेक्षा करु शकतो. आता तर आपण इतकंच बोलू शकतो की आमचं प्रोडक्ट चांगलं असून तुम्हा येऊन पाहा".
माधुरी म्हणाली, “कोणता चित्रपट चालेल किंवा नाही हे सांगणे फार कठीण आहे. पण मला माहित आहे की आम्ही चांगले प्रोडक्ट तयार केलं आहे. पण आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही एक अतिशय मनोरंजक चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता माझी आशा आहे की, प्रेक्षकांना चित्रपट आवडेल".
भूल भुलैय्या 3
या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी, विजय राज, राजपाल यादव, संजय मिश्रा आणि अश्विनी काळसेकर यांच्याही भूमिका आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित 'भूल भुलैया 3' हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आहे. 1 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यांच्यासमोर रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनचे आव्हान आहे.
सिंघम अगेन
सिंघम अगेनमध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत. सुपरहिट फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे. सिंघम 2011 मध्ये प्रदर्शित झाला, ज्यामध्ये काजल अग्रवाल आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते, त्यानंतर 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.