मोस्ट एलिजिबल बॅचलर अभिनेता विवाहबंधनात
पाहा त्याच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षण
मुंबई : लग्नसराईच्या या उत्साही दिवसांचे वारे हे थेट कलाविश्वापर्यंतही पोहोचले आहेत. आलिया रणबीरच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या चर्चांना एकीकडे उधाण आलेलं असताना महाराणा प्रताप या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शरद मल्होत्रा हा विवाहबंधनात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे. २० एप्रिलला आनंद कारजनुसार त्यांचा विवाहसोहळा पार पडला. ज्यानंतर हिंदू रितीरिवाजांनुसारही त्यांची लग्नगाठ बांधली गेली.
चाहते आणि कलाकारांच्या वर्तुळात सध्या शरद आणि त्याची पत्नी रिप्सी भाटिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत टेलिव्हिजन विश्वातील बऱ्याच कलाकार मित्रांसाठी ही जोडी एका जंगी स्वागत सोहळ्याचं आयोजन करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
सध्या त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो सर्वांचच लक्ष वेधत आहेत. ज्यामध्ये शरद आणि त्याची पत्नी वधू- वराच्या वेशात अगदी शोभून दिसत आहेत. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये रिप्सीचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे, तर शरदचाही रुबाब पाहण्याजोगा आहे. आपल्या खासगी आयुष्याविषयी फार खुलेपणाने न बोलणारा शरद सांगतो की, रिप्सी आणि माझ्या मनात असणाऱ्या लग्नाच्या भीतीमुळेच आम्ही एकत्र येऊ शकलो.
काही दिवस दुरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर आणि दोघांच्या कुटुंबीयांतीही मनं जुळल्यानंतर त्यांनी या लग्नाचा निर्णय घेतला. रिप्सीसोबतच्या नात्यापूर्वी शरद, 'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिच्यासोबत जवळपास ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्या नात्याला वेगळं देणार अशी अपेक्षा असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. दिव्यांकाने अभिनेता विवेक दाहिया याच्याशी लग्नगाठ बांधली तर, शरद त्याच्या कामात व्यग्र झाला. पण, आता मात्र ते दोघंही आपल्या खासगी आयुष्यात सुखी असल्याचं पाहायला मिळत आहे.