मुंबई : गुढीपाडवा हा सण काही दिवसांपूर्वीच पार पडला. असं असलं तरीही या सणाचा उत्साह मात्र आता, आठवड्याभरानंतरही पाहायला मिळत आहे. विविध पोटो म्हणू नका किंवा व्हिडिओ, या सणाच्या आठवणींची सोशल मीडियावर तोबा गर्दी आहे, असं म्हणायला हरकत नाही. या गर्दीतही सध्या एक व्हिडिओ स्वत:चं वेगळेपण जपत आहे. तेसुद्धा मोठ्या तोऱ्यात बरं का! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढीपाडवा म्हटलं की शोभायात्रा आणि शोभायात्रा म्हटलं की ढोल- ताशा पथकं. या सणाच्या निमित्ताने डोंबिवली येथे आयोजित अशाच एका शोभायात्रेच आरंभ नावाच्या ढोल-ताशा पथकाचं अफलातून सादरीकरण पाहायला मिळालं. प्रत्येक ढोल- ताशा पथकाचं आपलं असं वेगळेपण असतं. ते वेगळेपण जपलं जातं ढोलांवर वाजवल्या जाणाऱ्या तालातून. असाच एक वेगळा आणि भन्नाट ताल आरंभ ढोल- ताशा पथकाने सादर केला. 



'शिवप्रताप'पासून ते अगदी 'ढिंका- चिका' अशा तालांना इतर पथकांकडून प्राधान्य दिलं जात असताना आरंभच्या वादकांनी थेट एक परदेशी ठेकाच निवडला. 'गेम ऑफ थ्रोन्स' या ड्रामा सीरिजच्या थीमचा वापर करत ती थीम ढोलांच्या तालावर वाजवण्याची किमया वादकांनी केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. 



ताशाची तर्री आणि ढोलाचा ठोका यात सुरेख अशी सांगड घालत आणि सोबत अर्थातच 'गेम ऑफ थ्रोन्स'ची धून घेत पथकातील वादक, ध्वजधारी, ताशावादक अशा प्रत्येकाने मोठ्आ उत्साहात हा ताल वाजवला. यावेळी या कलेप्रती असणारी त्यांची आवडही पाहण्याजोगी आहे. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर हा 'गेम ऑफ ढोल्स'चा अफलातून व्हिडिओ शेअर करत त्याला अक्षरश: लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता ढोल- ताशा पथकंही काही वेगळ्या संकल्पनांचा अवलंब करत आहेत, असंच म्हणावं लागेल.