`आज एक वर्ष झालं त्या घटनेला...`, केदार शिंदेंनी सांगितली खास आठवण, म्हणाले `माझी मुलगी...`
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली.
Maharashtra Shaheer One Year Complete : शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा मराठी चित्रपट 28 एप्रिल 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहीरांचे नातू केदार शिंदे यांनी केले होते. या चित्रपटात शाहीरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली होती. तर या चित्रपटात सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली होती. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत. याला कॅप्शन देताना त्यांनी या चित्रपटाबद्दलच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यात त्यांनी चित्रपटाला सहकार्य केलेल्यांचे आभारही मानले आहेत.
केदार शिंदे यांची पोस्ट
"आपल्या आयुष्यात काही गोष्टी वेगळ्याच घडतात. परमेश्वराच्या कृपेने मी माझ्या आजोबा, म्हणजे शाहीर साबळे यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या आयुष्यावरचा एक भव्य दिव्य सिनेमा सादर करू शकलो. आज एक वर्ष झालं त्या घटनेला. मी हे करू शकलो ते माझ्या कुटुंबामुळे. संजय छाब्रिया, अंकुश चौधरी, अजय अतुल, गुरु ठाकूर, वासूदेव राणे, मयूर हरदास, मंदार, युगेशा ओमकार, ओमकार मंगेश, प्रतिमा कुलकर्णी आणि असे खूप महत्त्वाची लोकं. आणि असे खुप महत्वाची लोकं... सना शिंदे माझी मुलगी यानिमित्ताने पडद्यावर एक अभिनेत्री म्हणून सादर झाली. स्वामी समर्थ कृपेने हे शिवधनुष्य उचलू शकलो. प्रेक्षकांच्या प्रेमाने हे साध्य झालं. कायमचा ऋणी आहे मी सगळ्यांचा", असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.
केदार शिंदे यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. यावर अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाण्यावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर अनेकांनी रील बनवण्याचाही आनंद लुटला.