Sachin Goswami Post On Suresh Wadkar Statement : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सूरांची जादू दाखवणारे प्रसिद्ध गायक म्हणून सुरेश वाडकर यांना ओळखले जाते. सुरेश वाडकर यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली. त्यांच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यानंतर सुरेश वाडकर यांनी शिर्डी देवस्थानला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. पण यादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश वाडकर यांनी शिर्डी देवस्थानाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत भाष्य केलं. “साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची नेमणूक केली” असं ते यावेळी म्हणाले. या वक्तव्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी जोरदार टोला लगावला आहे. 


सचिन गोस्वामींची फेसबुक पोस्ट


महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. “पुढील ‘महाराष्ट्र भूषण’ (तुजं नमो गायक) सुरेश वाडकर…एक अंदाज.” अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावर विविध नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. 


यावर एका नेटकऱ्याने वाडकर "जर दर वेळी असे काही बोलू राहिले तर भारतरत्न पण भेटेल", अशी कमेंट केली आहे. तर एकाने "माझा अंदाज पद्मश्री", अशी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन गोस्वामी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 


सुरेश वाडकर नेमकं काय म्हणाले? 


सुरेश वाडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी देवस्थानाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी शिर्डीतील बदललेली परिस्थितीचे कौतुक केले. शिर्डीत आता खूप सुविधा झाल्या आहेत. दर्शन घेण्यासाठी सुलभता आली आहे. मंदिर प्रशासनही भाविकांना सर्वतोपरी मदत करत आहे. यावेळी पत्रकारांनी महाराष्ट्रातील आरक्षण आणि इतर प्रश्नांबाबत त्यांचे मत काय, याबद्दल विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, मी गाणं वाजवणारा माणूस आहे. मला राजकारणातलं काही कळत नाही. पण साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सर्वकाही चांगलं करणार. मला वाटतं देवी-देवतांनीच पंतप्रधान मोदींची नेमणूक केली आहे. सुरेश वाडकर यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.