Rohit Mane Buy New Home : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम कायमच टॉप 3 मध्ये पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याच कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून रोहित मानेला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात तो ‘सावत्या’ या नावाने प्रसिद्ध आहे. आता रोहित मानेने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित माने हा त्याच्या सहज आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. रोहित हा कायमच त्याच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भाष्य करताना दिसतो. तसेच तो याबद्दलचे काही फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असतो. आता रोहितने त्याच्या सर्व चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. 


रोहितने दाखवली नव्या घराची झलक


रोहितने नवीन घर खरेदी केले आहे. त्याचा एक व्हिडीओ आणि काही फोटोही त्याने शेअर केले आहेत. यातील एका फोटोत त्याने पत्नीचा हात हातात घेऊन त्यावर घराची चावी ठेवत फोटो पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याने नवीन घरातून काढलेला सेल्फी पोस्ट केला आहे. त्यासोबतच त्याने एका व्हिडीओद्वारे त्याच्या घराची झलकही दाखवली आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तो भावूक झाला. 


रोहित मानेने दिली गुडन्यूज


"मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमीत्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब रहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहीलो, काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून रहावं लागलं आणि काही घर खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळया प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःच हक्काचं घर असावं जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल. बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही पण श्रदधा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालंय. ही हिंमत आम्हाला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो... होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव. ह्या सगळयात माझे आई वडील, माझे सासू सासरे, हयांनी कायमचं आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू दया. कायम असंच प्रेम करत रहा. या प्रवासात सोबत असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पुर्ण होतोय पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून...", असे रोहित मानेने म्हटले आहे. 



कलाकारांनी दिल्या शुभेच्छा


रोहित मानेच्या या पोस्टवर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, नम्रता संभेराव, स्नेहल शिदम, साक्षी गांधी यांसारख्या अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्टवर अभिनंदन अशी कमेंट केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.