सुपरस्टार महेशबाबूचा मादाम तुसादमध्ये उभारणार मेणाचा पुतळा...
साऊथ सिनेसृष्टीची सुपरस्टार महेश बाबूचा भारत अने नेनु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.
मुंबई : साऊथ सिनेसृष्टीची सुपरस्टार महेश बाबूचा भारत अने नेनु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. त्याचे सर्वच सिनेमा सुपरहिट ठरतात, यात काहीच दुमत नाही. पण त्याच्या या यशात अजून एका मानाच तुरा रोवला गेलाय. जगभरात प्रसिद्ध असलेल्या मादाम तुसाद संग्रहालयात सुपरस्टार महेश बाबूचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ही बातमी महेशबाबूने ट्विटरवर शेअर केली आहे. ते शेअर करताना त्याने लिहिले की, प्रतिष्ठित मादाम तुसादचा भाग बनल्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. यासाठी माझ्या टीमचेही आभार, अतुल्य!
चाहत्यांसाठी सुखवार्ता
ही बातमी नक्कीच महेशबाबूच्या चाहत्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची असेल. जगभरातील त्याच्या चाहत्यांसाठी हे अनोखे गिफ्ट असेल. त्याचबरोबर महेशबाबूची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यासाठी योग्य माहिती मिळवल्याबद्दल महेशबाबूने मादाम तुसादच्या अधिकाऱ्यांचेही आभार मानले.
शंभर कोटीत स्थान मिळवलेल्या सिनेमाची चर्चा
भारत अने नेनु हा महेशबाबूचा सिनेमा सध्या चांगलाच गाजत असून सिनेमात महेशबाबूने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाने दोन दिवसात शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. आता हा सिनेमा किती कमाई करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.