`चुटकी`ऐवजी `भीम`ने केलं `इंदुमती`शी लग्न; नेटकरी हैराण
निर्मात्यांना उचलावं लागलं हे पाऊल
मुंबई : बच्चेकंपनीपासून ते अगदी सर्वच वयोगटातील कार्टून फिल्म प्रेमींमध्ये Chota Bheem 'छोटा भीम'ची अमाप लोकप्रियता आहे. अनेक वर्षांपासून छोटा भीम, चुटकी, राजू, अशी पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. काही दिवसांपासून मात्र यारों का यार असणाऱ्या या छोट्या भीमवर प्रेक्षक आणि नेटकरी नाराज झाले आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात भीमबाबतची नाराजी आहे, की चक्क सोशल मीडियावर त्याविषयीचे मीम्सही पोस्ट करण्यात आले. लग्नासाठी म्हणून छोटा भीम त्याच्या अगदी खास मैत्रीणीऐवजी म्हणजेच चुटकी ऐवजी राजकुमारी इंदुमतीची निवड करतो, असं दाखवण्यात आल्याचं म्हटलं गेलं. त्याच्या याच निर्णयामुळे चाहते मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. जी नाराजी बहुविध कलात्मक, विनोदी आणि तितक्याच कल्पक मीम्समधून व्यक्त करण्यात आली.
एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या कार्टून फिल्मविषयीची ही नाराजी पाहता अखेर या कार्टून फिल्म सीरिजच्या वतीनंच अधिकृत पत्रक जाहीर करत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या.
'भीम आणि त्याच्यासोबत झळकणारं प्रत्येक पात्र हे लहानच आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये लग्न किंवा त्या प्रकराची कोणतीही गोष्ट घडलेली नाही. किंबहुना त्याबाबतच्या चर्चाही खोट्याच आहेत. ही कार्टून पात्र सध्या लहानच राहू द्या आणि त्यांच्यात किमान सध्या प्रेम आणि लग्न वगैरे आणण्याची गरज नाही.... ', असं ग्रीन गोल्ड मॅनेजमेंटच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.
Unlock 1 : सैफ, करीनासह तैमूर मरीन ड्राईव्हवर; VIDEO VIRAL
आपल्यातर्फे साकारण्यात आलेल्या कार्टून सीरिजला मिळणाऱ्या लोकप्रियतेविषयी निर्माते- दिग्दर्शकांनी सर्व प्रेक्षकांचे आभारच मानले. सोबतच त्यांच्या मनात असणाऱ्या शंकांचंही एका अर्थी निरसन केलं असं म्हणायला हरकत नाही.