मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात उद्यापासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरूवात होणार आहे. लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण थांबले आहे. परिणामी बेरोजगारी वाट्याला आल्यामुळे टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवालने (Manmeet Grewal) या जगाचा निरोप घेतला आहे. तो ३२ वर्षांचा होता. शुक्रवारी रात्री नवी मुंबईतील राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ३२ वर्षीय अभिनेत्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मनमीतने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांकडे मदत मागितली परंतु कोरोनाच्या संशयामुळे शेजारच्यांनी देखील मदत करण्यास टाळाटाळ केली. 



मनमीतचा मित्र मनजित सिंग स्पॉटबॉयला म्हणाला, 'त्या संध्याकाळी तो अगदी सामान्य होता. काही वेळानंतर त्याने स्वःला रूममध्ये बंद करून घेतले. तेव्हा त्याची पत्नी स्वयंपाक घरात होती. जेव्हा तिने खुर्चीचा आवाज ऐकला तेव्हा ती ताबडतोब बेडरूममध्ये गेली.' त्यानंतर मनमीतच्या पत्नीने मदतीसाठी शेजाऱ्यांकडे मागणी केली, परंतु कोरोनाच्या भीतीने शेजाऱ्यांनी मदतीस नकार दिला. 


अखेर इमारतीमधील सुरक्षा रक्षकाने ओढणी फाडून मृतदेह खाली उतरवला आणि तात्काळ मनमीतला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मनमीतला मृत घोषित करण्यात आले. मनमीतने  ‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीपक’ या मलिकांमध्ये भूमिका साकारली होती. लॉकडाऊनमुळे तो बेरोजगार झाला होता. त्याच्याकडे घरभाडे भरण्यासाठी ८ हजार ५०० रूपये देखील नसल्याचं त्याच्या मित्राने पोलिसांना सांगितले आहे.