मानसी नाईक गैरवर्तन प्रकरणी पुण्यातून एक जण ताब्यात
अभिनेत्री मानसी नाईक गैरवर्तन प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
पुणे : अभिनेत्री मानसी नाईक यांनी मुंबईमधील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये रांजणगाव येथे गैरवर्तन झाल्याची तक्रार दाखल केली होती. ती तक्रार रांजणगाव पोलीसस्टेशन येथे वर्ग करण्यात आल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एक पथक तयार करून यातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी डीजे कामगार अजय कल्याणकर याला पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतले आहे.
मानसी नाईक यांच्या छेडछाड प्रकरणाशी युवासेनेचा काहीही संबंध नसल्याचे शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ५ फेब्रुवारी रोजी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रांजणगाव या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानसी नाईक परफॉर्मन्स करण्यासाठी आलेल्या असताना त्यांच्याशी एका अज्ञात व्यक्तीने छेडछाड केली होती. याप्रकरणी एकला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाशी युवासेनेचा काही संबंध नसून शिवसेनेला नाहक बदनाम करू नये असे आढळराव पाटील यांनी सांगितले. छेडछाड करणाऱ्या व्यक्तिशी शिवसेनेचा काहीही सबंध नसून तो डान्स करणाऱ्या टीममधीलच कलाकार असल्याचे ही आढळराव पाटील यांनी सांगितले.
गैरवर्तणूक प्रकरणी मानसी नाईक हिने तक्रार दाखल केल्यानंतर मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका अज्ञात व्यक्तीने मंचाजवळ जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केल्याचे मानसीने या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे प्रकरण माझ्यापर्यंत होते तोपर्यंत मी काहीही बोलले नाही. मात्र, माझ्या आईला धमकविण्याचा प्रयत्न झाला आहे. आज महिलांबाबत अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनी पुढे आले पाहिजे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मी घाबरणार नाही, मी गप्प बसणार नाही, असे तिने तक्रार दाखल केल्यानंतर स्पष्ट केले.