`पूर्वी शांत होतास लेका, पण हल्ली...`, किरण मानेंना पाहताच अशोक सराफ यांचं विधान
अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.
Ashok Saraf-Kiran Mane Meet : शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात येते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.
अभिनेते किरण माने यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मुलगी झाली हो या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आले. किरण माने हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच किरण मानेंनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भेट घेतली. या भेटीचा एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
किरण माने यांची पोस्ट
"किरण्या... हल्ली तू तलवारच उपसलीयस... मस्त लिहीतोस. मी वाचत असतो तुझे लेख. पुर्वी लै शांत होतास लेका. मुंबैत घर घेतलंस ना? नायतर एक फ्लायओव्हर बांध सातार्यापास्नं इथपर्यंत. किती दिवस सातारा-मुंबई प्रवास करत फिरणारंयस?" अशोकमामा भेटल्या-भेटल्या सुरू झाले. लै लै लै दिवसांनी भेटलो मामांना. ते ही शिवाजी मंदिरमध्ये. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. 'मनोमिलन' नाटकाच्या वेळची आमची घट्ट मैत्री आजबी मामांच्या मनात आहे हे बघून लै भारी वाटलं. मज्जा आली. आज दिन बन गया...., असे किरण माने म्हणाले.
किरण माने यांनी अशोक सराफ यांच्याबरोबर ‘मनोमिलन’ या नाटकात काम केले होते. या नाटकात किरण माने यांनी वडिलांची भूमिका साकारली होती. या नाटकात किरण माने, अशोक सराफ, श्वेता शिंदे, मोहित ताकालकर, शशांक शेडे, प्रवीण तरडे आणि ओंकार गोवर्धन हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते.
आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा अजून एका मोठ्या पुरस्काराने होणार सन्मान
दरम्यान सध्या किरण माने हे ‘सिंधूताई माझी माई’ मालिकेत काम करत आहेत. यात ते सिंधूताई सपकाळ यांच्या वडिलांची अभिमान साठेंची भूमिका साकारत आहेत. त्यासोबतच ते लवकरच ‘तेरवं’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 8 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.