प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांचा बहुचर्चित ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट प्रेम, लग्न, कमिटमेंट, संसार या आधुनिक विषयांवर भाष्य करताना दिसत आहे. यात सिद्धार्थ हा ‘प्रसन्न’, तर सई ‘श्रीदेवी’ ही भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमंत ढोमेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरसोबत त्याने हा चित्रपट त्याला कसा वाटला, याबद्दलही सांगितले आहे. 


हेमंत ढोमे काय म्हणाला?


"Review नाही, प्रेम! अशीच असेल का? असाच असेल का? हे सगळे प्रश्न आपल्यातल्या प्रत्येकाला कधी ना कधी पडलेच आहेत… या प्रश्नांची उत्तरं शोधणारा अतिशय गोंडस सिनेमा तुमच्या भेटीस आलाय… संपुर्ण कुटूंबाला घेऊन जा आणि नक्की बघा… तुम्हाला हा सिनेमा “प्रसन्न” करेल! आता “प्रसन्न” करेल असं म्हणण्याचं प्रमुख कारण म्हणजे प्रसन्न हे पात्र साकारणारा अभिनेता… सध्या जो स्वतःच त्याच्या कामावर आणि आपल्यावर देखील विशेष प्रसन्न आहे तो सिद्धार्थ चांदेकर… त्याचं आजवरचं सर्वोत्तम काम बघायचं असेल तर हा सिनेमा जरूर बघा तुम्ही या गोंधळलेल्या प्रसन्नच्या प्रेमात नक्की पडाल… कमाल कमाल कमाल (त्याचा मित्र म्हणुन नाही तर एक प्रेक्षक म्हणुन मी हे लिहितोय… ज्या प्रेक्षकाला मराठी मधे अतिशय छान काम करणारे आणि screen presence असणारे असे अभिनेते बघायचे आहेत… मराठीत सुद्धा स्टार बघायचे आहेत…) so so so proud of you my boy!!!  


सई ताम्हणकर ही तर माझी फेवरेट अभिनेत्री आहेच, तिची ही श्रीदेवी सुद्धा कमालच! (डोळे हे जुल्मी गडे). विशाल मोढवे आणि त्याच्या संपुर्ण टिमचं खूप खूप अभिनंदन! अजून असंच सुंदर काम तुझ्या कडून होईल ही खात्री आहे… आत्ता कुठे सुरूवात झालीय! अमित राज आणि क्षितीज पटवर्धन या माझ्या लाडक्या जोडीचं अजून एक सुंदर काम! आणि हो सुलभा आर्या यांच्यासाठी कडकडीत टाळ्या आणि शिट्टया! पण सिनेमा जिंकला आहे तो स्वाती या गोंडस म्हशीने! स्वाती… काय टायमिंग, काय ती समज! ओहो…", अशी पोस्ट हेमंत ढोमेने केली आहे. 



दरम्यान हेमंत ढोमेच्या या पोस्टवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने कमेंट केली आहे. त्याने यात "मी ही पोस्ट वाचताना रडलो", असे म्हटले आहे. तर अभीर कुलकर्णीने "बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर हा अवॉर्ड म्हशीला नक्की मिळणार आहे", असे म्हटले आहे. त्यावर हेमंतने "स्वाती!!! तिचं टायमिंग तर अफलातुन!" अशी प्रतिक्रिया दिली आहे.