`मुलगी झाली हो` मालिकेचा उल्लेख करत किरण मानेंची पोस्ट, म्हणाले `प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून...`
किरण माने राजकारणात नशीब अजमावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
Kiran Mane Mulgi Zali Ho Serial : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते किरण माने हे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. मुलगी झाली हो या मालिकेमुळे ते चर्चेत आले. या मालिकेत त्यांनी साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील ही भूमिका साकारली होती. मात्र काही वर्षांपूर्वी अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर आता बऱ्याच महिन्यांनी किरण माने यांनी याच मालिकेतील कलाकारांबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर यांच्याबरोबर काही खास फोटो शेअर केले आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी या मालिकेवरुन झालेल्या वादाबद्दल भाष्य केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत
"काही नातीच अशी असतात, ज्यांची कित्येक काळ भेट नाही झाली तरी ती ताजी टवटवीत रहातात ! तब्बल दोन वर्षांनंतर प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर भेटल्या. ते ही अचानक 'रमा राघव' च्या सेटवर. किती बोलू आणि किती नको असं झालं... धमाल केली आम्ही. 'मुलगी झाली हो' च्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी झडत असताना... अचानक स्वत:च्या करीयरची पर्वा न करता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहीलेल्या या माझ्या जिगरी मैत्रीणी ! या दोघींसोबत शितल गिते आणि गौरी सोनारही होत्या.
"किरणसर, वेळ पडली तर अभिनय सोडू पण तुमच्यावर विनाकारण होणारे आघात आता गप्प बसून पाहू शकत नाही. आम्ही तीन वर्ष रोज पहातोय तुम्हाला. भल्या माणसाची ही खोटी बदनामी आम्हाला आता सहन नाही होत." असं म्हणत प्राॅडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून जाहीरपणे सगळ्या न्यूज चॅनलवर या रणरागिणी निर्भिडपणे 'सत्य' बोलल्या.
माझ्यासाठी आयुष्यातला तो अविस्मरणीय आणि अद्भूत क्षण होता. जगात स्त्रियांना आदर आहे तो अशा निडर सावित्रीच्या लेकींमुळेच. प्राजक्ता-श्वेता, तुम्हाला कामात बिझी असलेलं पाहून लै लै लै भारी वाटलं... आनंदी रहा... खुश रहा... लब्यू",असे किरण माने यांनी म्हटले आहे.
दरम्यान किरण माने हे आपल्या अभिनयाच्या जोरावर किरण मानेंनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बिग बॉस मराठी’तून किरण माने घराघरांत पोहोचले. अभिनय क्षेत्र गाजविल्यानंतर आता किरण माने राजकारणात नशीब अजमावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यासोबतच ‘सिंधुताई माझी आई’ या मालिकेत त्यांनी सिंधूताई सपकाळ यांच्या वडिलांची अभिमान साठेंची साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. आता लवकरच त्यांचा पहिला चित्रपट ‘तेरवं’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 8 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.