Actor Kiran Mane Tweet : प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी काही महिन्यांपूर्वी हातात शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. सध्या ते राजकारणात नशीब आजमावताना दिसत आहेत. सध्या ते महाविकासआघाडीच्या अनेक सभांना हजेरी लावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी माढा मतदारसंघातील एका सभेत जोरदार भाषण केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता किरण मानेंच्या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभेत कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य मिळेल, असा विश्वास आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. या मेळाव्यासाठी किरण माने यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. पण शूटींगच्या कारणात्सव ते गैरहजर राहिले. आता किरण माने यांनी एक ट्वीट केले आहे.  


किरण माने यांचे ट्वीट


या ट्वीटमध्ये ते म्हणाले, शशिकांत शिंदेसाहेबांनी मला फोन करून निमंत्रण दिले होते... पण मी शुटिंगसाठी कोल्हापूरला असल्यामुळे जाता आलं नाही. सातारा जिल्हा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा कोरेगांव येथे खुप मोठ्या उत्साहात पार पडला... लाट कुठलीही असूदे, पण सातारा जिल्हा कायम पवारसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. 


या ही मेळाव्यात 'पवारसाहेब सांगतील तो उमेदवार निवडून द्यायचा' हे ठरवताना तुतारी, हाताचा पंजा आणि मशाल तिघांचेही एकमत झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नितिन बानुगडे पाटील उपस्थित होते. हवा बदललीय. वातावरण तापलंय. मतदार राजा प्रचंड अस्वस्थ आहे. महाराष्ट्र नासवणारी वृत्ती ठेचून काढायची हे प्रत्येकानं मनाशी ठरवलंय. आता आर नायतर पार... विषारी पिलावळ तडीपार, असा घणाघात किरण माने यांनी केला. 



दरम्यान किरण माने हे स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर ते 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात झळकली. त्यासोबतच किरण मानेंनी 'सिंधुताई माझी माई' या मालिकेत अभिमान साठे ही भूमिका साकारली होती. सध्या किरण माने हे एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.