Pushkar Jog On Marathi Movie : मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' अशी ओळख असलेल्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. तो एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच चांगला डान्सरही आहे. पुष्कर हा 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. त्याला त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. आता पुष्कर जोगने एका मुलाखतीदरम्यान मराठी सिनेसृष्टीची पोलखोल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुष्कर जोगने नुकतंच 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला "तुझ्या सरळ स्वभावामुळे काही भूमिका गमवाव्या लागल्या का?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने स्पष्ट भाषेत उत्तर दिले. "मला उगाचच हा जी हा जी करणं कधीच जमलं नाही. कदाचित ते जमलं असतं तर मी अजून 10 चित्रपट केले असते", असे पुष्कर जोग यावेळी म्हणाला.


"मला हा जी हा जी करणं कधीच जमलं नाही"


"बिग बॉसनंतर मी अनेक चित्रपट केले. पण माझ्या स्वभावामुळे मी अनेक चित्रपट गमावले. मनोरंजनसृष्टीत अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजेच सिनेसृष्टीतील काही दिग्गजांना मी त्यांच्याप्रमाणे वागावं, असं वाटत असतं. आपण त्यांच्यासमोर हा जी हा जी करावं, तुम्ही तर फार भारी आहात, असं त्यांच्यापुढे सतत करावं असं वाटत असतं. जे मला करायला जमत नाही. मला ते करता येत नाही", असे पुष्कर जोगने सांगितले.


त्यापुढे तो म्हणाला, "मी कधीच कोणत्याही पार्टीसाठी किंवा दारु पिण्यासाठी जात नाही. मला उगाचच हा जी हा जी करणं कधीच जमलं नाही. कदाचित ते जमलं असतं तर मी अजून 10 चित्रपट केले असते. साधेपणा हेच माझ्यासाठी स्टारडम आहे. स्टारडम हे साधेपणा, तुम्ही लोकांना कसे वागवता यावर ठरते. मी कधीही पुढे पुढे केलं नाही. मला ते करावं असं कधी वाटलंही नाही." 


"तुमच्या नशीबात जे लिहिलं आहे तेच होणार"


"पण मी एक गोष्ट आजही आवर्जुन करतो. मी त्या दिग्गजांचे चित्रपट पाहून मोठा झालो आहे. ते खरंच दिग्गज आहे. मी त्यांना मेसेज करतो आणि सांगतो, सर मी जाण्याआधी तरी तुमच्याबरोबर काम करायचं. मी आता इथपर्यंत मेसेज करतो. पण हरकत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची निवड असते. पण तुम्हाला एक सांगतो तुम्ही कितीही कष्ट करा, फोन करा, मेहनत करा, पार्ट्यांना जा, तुमच्या नशीबात जे लिहिलं आहे तेच होणार. तुमच्या नशीबात एखादा चित्रपट असेल तर तो कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. हे सर्व नशिबावर आहे", असेही पुष्कर जोग यावेळी म्हणाला.