सचिन पिळगावकर शिंदे गटातून निवडणूक लढणार? म्हणाले `मी लोकसभा...`
आता मुंबईतील एका प्रतिष्ठित लोकसभेच्या मतदारसंघासाठी अभिनेते सचिन पिळगावकरांचा विचार होत असल्याचे बोललं जात आहे.
Sachin Pilgaonkar LokSabha Election : सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सध्या अनेक कलाकार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे काही कलाकार हे राजकीय इनिंग सुरु करताना दिसत आहेत. अभिनेते किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटात प्रवेश केला. तर अभिनेता गोविंदाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश करत शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. तसेच अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबईतील एका प्रतिष्ठित लोकसभेच्या मतदारसंघासाठी अभिनेते सचिन पिळगावकरांचा विचार होत असल्याचे बोललं जात आहे.
सचिन पिळगावकरांना शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची शक्यता
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील प्रतिष्ठित मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघासाठी तीन मराठी कलाकारांच्या नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेते सचिन खेडेकर अशी ही तीन नावे असल्याचे बोललं जात आहे. या अभिनेत्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता या चर्चांवर अभिनेते सचिन पिळगावकरांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे.
मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी अफवा माझ्या कानावर आली आहे. मी ही अफवा ऐकून खूप हसलो. मी एवढंच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी फक्त माझ्या प्रेक्षकांचा आहे. गेली 61 वर्षे मी आपला आहे, असे सचिन पिळगावकरांनी म्हटले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर ते निवडणूक लढवण्याच्या चर्चा फक्त चर्चात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त
दरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सचिन पिळगावकरांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. ‘महागुरु’ या नावाने त्यांना विशेष ओळखले जाते. सध्या ते नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे.