मुंबई : 'मोरया', 'झेंडा' अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या बळावर खऱ्या अर्थानं तरुणाईचा चेहरा झालेल्या अभिनेता संतोष जुवेकर यानं सोशल मीडियावर नुकताच त्याचा नवा लूक शेअर केला. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच त्यानंही सोशल मीडियाचा आधार घेत हा नवा लूक चाहत्यांच्या भेटीला आणला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारी एक दरी कमी करण्याचं माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जातं. याचा प्रत्यय संतोषनं फोटो पोस्ट करताच आला. अनेकांनी त्याच्या या नव्या रुपाची प्रशंसा केली. पण, या साऱ्यामध्ये एका युजरनं संतोषच्या फोटोवर अशी काही कमेंट केली, की अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 


लॉकडाऊन काळात दाढीमिशी वाढवलेल्या लूकला रामराम ठोकत संतोषनं अखेर क्लीन शेव्ह लूक केला. अतिशय नव्या अशा या रुपात त्यानं फोटो पोस्ट करत लिहिलं, 'बऱ्याच दिवसांन दाढी भादरलीया. मैत्रिणीला फोटू पाठवला तर म्हनली कवळा रतन दिसतुयास....... आयला टाळकंच सरकलंना भावा आपलं तीला म्हनलं....... "संतोष नाव हाय माझं ह्यो रतन कोन आणलास आनी?" कधी कधी असं गुळगुळीत पण चरचरित दिसत नाय!!??'. 


संतोषनं हा फोटो पोस्ट करताच आलेल्या कमेंट्सच्या गर्दीत एका कमेंटनं त्याचंही लक्ष वेधलं. मुळात त्यानं या कमेंट करणाऱ्या युजरला अतिशय मोजक्या शब्दांत समज देत मोलाचा सल्लाही दिला. संभाजी पाटील अशा नावाच्या एका युजरनं संतोषच्या फोटोवर, 'मिश्या काढल्यामुळं छक्क्यासारखा दिसतोय' अशी कमेंट केली. ज्यावर थेट उत्तर देत, जे नाव टीका करण्यासाठी उच्चारलंस त्या नावात फार मोठी ताकद आहे हे स्पष्ट केलं. 



 


खुद्द संतोषनंच सोशल मीडियावर यासंदर्भातील स्क्रीनशॉटही शेअर केला. ज्यामाध्यमातून टीका करणाऱ्या त्या युजरवर आपला राग नसून इतरही चाहत्यांनी त्याचा राग करु नये अशी विनंती केली. शिवाय अशा वृत्तीच्या व्यक्तींना सदबुद्धी दे, असं म्हणत त्यानं ईश्वराचरणी प्रार्थनाही केली.