HSC Results : मुलीचे बारावीतील गुण पाहून शरद पोंक्षे भावूक
तिने संपादन केलेलं यश पाहून तुम्हीही कौतुकच कराल
मुंबई : गुरुवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या उच्च शिक्षण विभागाचे म्हणजेच इयत्ता बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. बऱ्याच दिवसांपासून निकाल लांबणीवर गेल्यावर अखेर ते जाहीर झाल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळाला. या आऩंदात मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेतेही सहभागी झाले.
निमित्त होतं ते म्हणजे त्यांच्या मुलीनं संपादन केलेलं यश. आपल्या अभिनयाच्या बळावर रंगभूमी आणि कलाविश्व खऱ्या अर्थानं गाजवणाऱ्या अभिनेता शरद पोंक्षे यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या मुलीचे मार्क सर्वांनाच सांगत तिचं कौतुक केलं.
'२०१९ माझे कर्करोगावरील ऊपचार चालू असताना, हॉस्पिटलमधे येऊन कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेंशनमधे असतानाही पिल्लूनं ८७% मार्क १२ विज्ञान शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला आणि सतत वाईट बातम्या चहूबाजूनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.
पोंक्षे यांनी ही पोस्ट लिहिताच कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या मुलीचं आणि त्यांचंही अनेकांनी अभिनंदन केलं. आपल्या आजारपणाच्या काळात कुटुंबाची साथ असल्याचं शरद पोंक्षे यांनी कायमच त्यांच्या मुलाखतीत सांगितलं आहे. पण, त्यातही त्यांना मुलीचं विशेष अप्रूप. त्यांचं हेच प्रेम या पोस्टमधूनही व्यक्त होत आहे.
२०१९ माझे कर्करोगावरील ऊपचार चालू असताना, हाॅस्पिटलमधे येऊन काॅलेज अभ्यास करून एवढ्या टेंशनमधे असतानाही पिल्लून ८७%मार्क...
Posted by शरद माधव पोंक्षे on Thursday, July 16, 2020
दरम्यान, यंदाच्या वर्षी HSC साठीचा राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला. शिवाय यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के असून मुलांचा निकाल ८८.०४ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी १२ वी चा निकाल ८५.८८ % लागला होता.