मुंबई : महाराष्ट्र किंवा देशाच्या इतिहारात, राजकारणा, क्रीडा किंवा कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्तींचा जीवनपट आजवर अनेकदा रुपेरी पडद्यावर उलगडण्यात आला आहे. त्यातच आता येत्या काळात आणखी एका अतीव महत्त्वाच्या अशा व्यक्तीच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकला जाण्याची चिन्हं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख आणि माजी कृषीमंत्री, राजकारणातील एक मुरब्बी व्यक्तीमत्व अशी ओळख असणाऱ्या sharad pawar शरद पवार यांच्या जीवनावर चित्रपट साकारला जाऊ शकतो. असं झालंच तर, अभिनेता  subodh bhave सुबोध भावे याने चित्रपटात पवारांची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणाऱ्या नेत्याचीच भूमिका साकारायला आवडेल असं सांगत सुबोधने शरद पवारांच्या व्यक्तीरेखेला पसंती दिली. सिल्व्हर ओक या पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट साकारण्यात आला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने प्रमुख भूमिकेला न्याय दिला होता. तेव्हा आता पवारांच्या कार्यावर आधारित चित्रपट साकारल्यास आणि त्यात संधी मिळाल्यास सुबोध ही जबाबदारी कशी पेलतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



सुबोध भावेने यापूर्वी बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या व्यक्तीरेखा मोठ्या पडद्यावर साकारल्या आहेत. त्याच्या कारकिर्दीतील या भूमिका पाहता, येत्या काळातही सुबोधकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा असतील असं म्हणायला हरकत नाही.