Deepali Sayed On Maratha Reservation Question : सध्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणासाठी घरोघरी फॉर्म दिला जात आहे. प्रत्येक कुटुंबांना हा फॉर्म भरुन देण्यास सांगण्यात आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील या फॉर्ममध्ये विधवा स्त्रियांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले आहे. यावर आता एका मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिपाली सय्यद या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचा फॉर्म दिसत आहे. यावर तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का? तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का? तुमच्या समाजात विधवा स्त्री औंक्षण करु शकतात का? तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का? तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक पूजा पाठ करु दिलं जातं का? असे विविध प्रश्न दिसत आहेत.


आता यावर दिपाली सय्यद यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे जाचक प्रश्न या यादीमधून तात्काळ हटवावे, अशी विनंती केली आहे. 


दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंना केली विनंती


"सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आपण मराठा समाजाला आरक्षण संदर्भात दिलेला शब्द पूर्ण करून या समाजाला आरक्षण दिले याबद्दल आपले खूप अभिनंदन सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले अभिनंदन करत असताना मी एक महिला म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाच्या प्रश्नावली वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे साहेब मराठा आरक्षण देण्यासंदर्भात या समितीने विधवा महिलांच्या विषयी काही जाचक प्रश्न विचारले आहेत तरी आपण कर्तृत्वशाली मुख्यमंत्री असून हे जाचक प्रश्न या यादीमधून तात्काळ हटवावे ही आपणास विनंती", असे दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे. 



दरम्यान दिपाली सय्यद यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत. आता दिपाली सय्यद यांच्या या तक्रारीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.