`12-13 तास सतत रडणं, प्रचंड थकवा अन्...`, सतत दुखाचे सीन केल्याने `अरुंधती`च्या तब्येतीवर परिणाम
आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीचा नवीन प्रवास सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आशुतोष म्हणजे अभिनेता ओंकार गोवर्धनची मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
Madhurani Prabhulkar Emotional Post : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलं होतं. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला होता. सध्या अरुंधतीचे सतत रडण्याचे सीन्स दाखवण्यात येत आहेत. यामुळे मालिकेला तसेच यातील अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता यावर अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने भाष्य केले आहे.
मधुराणी प्रभुलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. हे सर्व फोटो आशुतोषचा मृत्यू झाला त्यावेळीच्या शूटींगदरम्यानचे आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने मालिकेच्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केले. त्यासोबतच तिने या सीनचे शूटींग करणं किती कठीण होतं, याबद्दलही सांगितले आहे.
मधुराणी प्रभुलकरची पोस्ट
"मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय. आशुतोषचं 'जाणं ' अनेकांना आवडलं नाहीये...कसं आवडेल.... ! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला... पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल.
गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे... १२/ १३ तास सलग असे काही दिवस रडते आहे... ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो.. हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच... डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही ( unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात.
अरुंधती आशुतोष ला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच....!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील..!", असे मधुराणीने म्हटले आहे.
दरम्यान आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीचा नवीन प्रवास सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आशुतोष म्हणजे अभिनेता ओंकार गोवर्धनची मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मधुराणीच्या या पोस्टवर ओंकारनेही कमेंट केली आहे. “मधुराणी मला पण तुझी आठवण कायम येईल.आपण खूप चांगलं काम केलं. एकत्र पुन्हा आपण एकत्र काम करूच. तोपर्यंत पुन्हा लवकरात लवकर भेटण्याची आशा आहेच. प्रेम आणि सदिच्छा.” असे ओंकारने म्हटले आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.