Prajakta Mali Special Appearance Nach Ga Ghuma : परेश मोकाशी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'नाच गं घुमा' हा चित्रपट बुधवारी 1 मे 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून मालकीण आणि मोलकरणीचे विश्व दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर, गाणे आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीचीही खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्राजक्ता माळी ही सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. आता प्राजक्ता माळीने 'नाच गं घुमा' या चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टसोबत तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता माळी ही 'नाच गं घुमा' या चित्रपटातील सर्व कलाकारांची झलक दाखवताना दिसत आहे. यावेळी प्राजक्ता माळी ही या चित्रपटात कशी झळकली, याबद्दल भाष्य करताना दिसत आहे. 


प्राजक्ता माळीने दिले स्पष्टीकरण


"प्राजक्तराजची पहिली अधिकृत ज्वेलरी पार्टनरशिप आणि ते ही “नाच गं घुमा”.. सारख्या चित्रपटाबरोबर... अत्यंत दर्जेदार कलाकृतीबरोबर “प्राजक्तराज” जोडलं गेलं ह्याचा आत्यंतिक आनंद, समाधान आणि अभिमान आहे. (व्हिडीओ मधील माझ्या आवाजावरून जाणवत असेलच..)


ज्यांनी ज्यांनी काल चित्रपट पाहिला, end scroll ला मी नाचताना दिसले आणि ही इथे का? याची total लागली नाही.. त्याच हे उत्तर... मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी यासाठी तुमचे खूप खूप आभार", असे प्राजक्ता माळी म्हणाली. 



दरम्यान ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी हा निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटातून प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट दाखवली जाणार आहे. तसेच ‘नाच गं घुमा’ची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे