Priya Bapat Marathi Paul Padte Pudhe Award : मराठी मनोरंजनविश्वातील अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार नुकताच पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यांनी उपस्थित लावली. यंदा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्कारावर अभिनेत्री प्रिया बापटने नाव कोरलं आहे. आता याबद्दल प्रिया बापटने पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी ‘जीवन गौरव’ व ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे दोन मानाचे पुरस्कार जाहीर जातात. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. तर, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्कारावर अभिनेत्री प्रिया बापटने नाव कोरलं आहे. आता प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा पती उमेश कामतचे आभार मानले आहेत. 


प्रिया बापट काय म्हणाली? 


“मराठी पाउल पडते पुढे” आपल्या यशाचं कौतुक होत, पण तिथपर्यंत पोहोचण्याच्य प्रवासाला शाबासकी मिळणं हे जास्त Special आहे. आपल्या कष्टांची, मेहनतीची दखल घेउन त्यातून मिळवलेल्या यशाबद्दल उभ्या महाराष्ट्राला अभिमान वाटणं हे खूप मानाचं आहे. आज हा पुरस्कार स्विकारकाना मन भरून आलं. माझा अभिनेत्री म्हणून आजपर्यंतच्या प्रवासातले सगळे दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, विद्या ताई सर्वांना खूप खूप धन्यवाद.


झी मराठी या मानासाठी मनःपूर्वक धन्यवाद.  मोठी झेप घेउ पाहणाऱ्या माझ्या पंखांना बळ देणाऱ्या आई- वडिलांना नमस्कार. माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास दाखवून मला नवं आकाश खुलं करून देणाऱ्या नागेश कुकनूर यांना मनःपूर्वक धन्यवाद. श्वेता तुला खूप खूप प्रेम. मुकुंद मेन्शन माझं कुटुंब आहे आणि राहील. आणि कायम माझ्या सोबत, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून प्रेम करणारा उमेश. तू नसतास तर मला आयुष्यात काहीही करता आले नसते. Love you, असे प्रिया बापटने म्हटले आहे. 



प्रिया बापटच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करत तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. यावर अभिनेता जितेंद्र जोशीने इन्स्टाग्रामवर पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. एका पाऊलासोबत कित्ती पाऊले असतात आणि त्यामुळेच त्या पाउलाला बळ मिळतं. तुझी वाट अधिकाधिक समृद्ध होवो. तुला यशापलिकडचा आनंद सदैव प्राप्त होवो, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे. तर सुखदा खांडकेकर, प्रसाद ओक, अमृता खानविलकर, सलील कुलकर्णी, आशुतोष गोखले या कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.