मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रानौत हिची मुख्य भूमिका असणारा 'पंगा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अश्विनी अय्यर तिवारीच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण, काहींनी मात्र या चित्रपटाविषय़ी अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिल्या. कोणी कंगनाने साकारलेल्या भूमिकेची प्रशंसा केली, तर कोणी या चित्रपटातून दिल्या गेलेल्या संदेशाला दुजोरा दिला, कोणी सहकलाकारांचंही कौतुक केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या बॉलिवूडपटामध्ये एक मराठमोळा चेहराही झळकला. तो चेहरा म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे हिचा. स्मिताने या चित्रपटात भारतीय कबड्डी संघाच्या कर्णधाराची भूमिका साकारली. कौतुक म्हणजे तिने साकारलेल्या पात्राचं नावही स्मिता तांबे. इथे फक्त नावाच साम्य नाही, तर कबड्डी या खेळाविषयीचं प्रेम, समज आणि अर्थातच 'पंगा' यांमध्ये साम्य आहे. 


'पंगा' या चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे 'जया निगम' ही समाजव्यवस्थेलाच आव्हान  देते, त्याचप्रमाणे स्मिता तांबे हिने खऱ्या जीवनातही अशा काही प्रसंगांचा सामना केला आहे. याविषयी खुद्द स्मितानेच सांगितलं. 'चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा चेहरेपट्टी ही अगदी सर्वसामान्य असल्यामुळेच मला अनेकदा भूमिकांसाठी निवडलं जात नव्हतं. पण, त्यामुळेच एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करायचं बळ मला मिळालं', असं म्हणत चित्रपटातील जया मला बरंच काही शिकवून गेली असं स्मिता म्हणाली. 


अश्विनी अय्यर तिवारी आणि कंगना रानौत यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयीही तिने काही गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. चित्रपटाच्या सेटवर कितीही माणसं असली तरीही प्रत्येताशी अश्विनीचं तसं खास नातं तयार झाल्याचं स्मिताने सांगितलं. याच नात्याखातर अश्विनीने चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्वहस्ते एक पत्र लिहित ते स्मिताला दिलं होतं. आपल्यासाठी ते पत्र खूप खास असल्याचं स्मिता न विसरता सांगते. 




कंगनाने दिलेली दाद मी कधीच विसरु शकत नाही. 


कंगना रानौत ही एक प्रगल्भ अभिनेत्री असल्याचं सांगत सेटवर तिच्यासोबत वावरताना आपण कायम तिचं निरिक्षण करत असल्याचं तिने सांगितलं. यावेळी तिने एक अनुभवही सांगितला, जो कायमचाच स्मिताच्या मनात घर करुन गेला. 'चित्रपटात स्मिता(स्मिता तांबे) आणि जया(कंगना रनौत) ह्यांच्यात एक व्दंव्दं दाखवण्यात आलं आहे. अशावेळी कॅप्टन स्मिता ही एका दृश्यात जयाला म्हणते, “चलो कमसे कम इस बहाने तुम मॅट पे तो आयी’ ... त्यावेळी कंगना मॉनिटरसमोर उभी राहून माझा अभिनय पाहत होती. दृश्य़ चित्रीत झाल्यानंतर ‘तुझे डोळे इंटेन्स (उत्कट भाव व्यक्त करणारे) आहेत’, अशी दाद दिली. तो क्षण मी कधीच विसरू शकतं नाही', असा अनुभव तिने सांगितला.