प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : सोनाली कुलकर्णी नटरंगमधल्या अप्सराच्या बेडीत अडकली होती, तिही थोडीथोडकी नाही, तर तब्बल दहा वर्ष...काही केल्या या बेडीतून तिची सुटका होत नव्हती. मात्र आता ही बेडी सैल झालीये. कारण अप्सरा आता बनलीये हिरकणी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ जानेवारी २०१०ला प्रदर्शित झालेल्या 'नटरंग' चित्रपटातील 'अप्सरा आली....' या गाण्याचा फिव्हर आजही तितकाच आहे. रवी जाधवचं दिग्दर्शन, अजय-अतुलचं संगीत आणि 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचं ठेका धरायला लावणारं आणि दर्दी चाहत्यांना अक्षरशः घायाळ करणारं नृत्य. 


सोनाली कुलकर्णी हिला चाहत्यांच्या मनातली 'अप्सरा' अशी ओळख करून देणारी ही भूमिका. सुरुवातीच्या काळात सोनाली कुलकर्णीसाठी ही ओळख फायदेशीरही ठरली. मात्र पुढे हीच ओळख तिच्या पुढच्या वाटचालीसाठी डोकेदुखी ठरू लागली. सोनाली म्हटलं की 'अप्सरा' असं जणू समीकरणच झालं. 'नटरंग'मधील या 'अप्सरे'च्या भूमिकेचं भरभरून कौतुक झालं. 



गेली ९-१० वर्षे वेगवेगळ्या इव्हेंट्समध्येही सोनालीने याच गाण्यावर नृत्य करत बक्कळ प्रसिद्धी आणि पैसाही कमावला. मात्र दुसरीकडे पुढे त्याच प्रकारच्या भूमिका सोनालीकडे येऊ लागल्या. त्यामुळे स्वतः सोनालीलाही या एकाच भूमिकेत अडकून पडून राहणं अवघड होऊन बसलं. 



आता मात्र तिच्या या ओळखीने कात टाकली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेने तिला अखेर ही संधी मिळाली. या हिरकणीचं समीक्षकांसह प्रेक्षकांनीही कौतुक केलं. खऱ्याखुऱ्या हिरकणीच्या साहसाची दाद देत रुपेरी पडद्यावर ती साकारणाऱ्या सोनालीचीही प्रशंसा केली. मुळात सोनालीनेही या भूमिकेसाठी खास मेहनत घेतल्याचं चित्रपटात स्पष्ट दिसून आलं. ज्यामुळे 'अप्सरा' ही ओळख मागे पडून सोनालीची नवी 'हिरकणी' म्हणून होणारी ओळख यापुढे अधिक ठसठशीत होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.