साथीदारासोबत नव्या प्रवासाची सुरुवात करतेय सोनाली
आता चाहत्यांना वेध....
मुंबई : 'बकुळा नामदेव घोटाळे', 'नटरंग', 'हिरकणी' या आणि अशा काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता तिच्या जीवनातील एका मह्तत्वाच्या वळणावर आल्याचं म्हटलं जात आहे. अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या सोनालीच्या जीवनात आता म्हणे एका खास व्यक्तीची एंट्री झाली आहे.
खुद्द सोनालीनेच त्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा केल्याचंही म्हटलं जात आहे. आता सोनालीच्या जीवनात आलेला तो खास चेहरा आहे तरी कोणाचा, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर.... हा चेहरा आहे, कुणाल बेनोडेकर याचा. सोनालीने सोशल मीडियावर एक साहसी व्हिडिओ शेअर करत त्यामध्ये कुणालला टॅग केलं आहे.
साथीदारासोबत आता एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे, असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. सर्व प्रकारचे चढ-उतार आणि साहसांसाठी तयार.... असंही तिने यामध्ये लिहिलं आहे. सोनालीने लिहिलेलं हे कॅप्शन पाहता आता त्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा हा अनेकांना पडलेला प्रश्नच आहे.
सोशल मीडियावर सोनालीचा हा व्हिडिओ पाहता तिच्या या 'साथीदारा'विषयीसुद्धा बरंच कुतूहल पाहायला मिळत आहे. तेव्हा आता, ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचण्याची प्रतिक्षा करायला लावण्यापेक्षा सोनालीच कधी याबाबतची माहिती देते हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.