`मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन; सरकारने...`, गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य

Vaishali Samant : लोकप्रिय गायिका वैशाली सामंतनं नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे.
Vaishali Samant : आपल्या सर्वांची लाडकी आणि सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या वेगवेगळी गाणी गाऊन प्रत्येकाच्या मनात तिचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, मराठी तसेच इतर कुठल्याही भाषांमध्ये वैशाली सामंत सहजतेने वावरलेली आहे. वैशाली सामंत ही फक्त गायिकाच नव्हे तर संगीतकार, गीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वैशाली सामंतनं मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन मिळते. सरकारने लक्ष द्यायला हवं असं वक्तव्य केलं आहे.
आपल्या महाराष्ट्रात टॅलेंटची कमी अजिबात नाही आहे.गरज आहे ती फक्त सोबतीची, एका पाठबळाची. नुकतच राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने Music Podcast सुरू केला असून, त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलतं केलं आहे. याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. सावनीच्या या Podcast साठी वैशाली सामंत पोहोचली होती.
सावनीने आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत असं विचारल्यावर वैशाली सामंत म्हणाली की, सरकराने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. “आपल्या कलाकारांना PF मिळतो का तर नाही, पेंशन मिळते का तर नाही. मला असं वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल. आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते. थोडसं सरकारनं मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालाव."
हेही वाचा : थोडक्यात वाचली अर्चना पूरन सिंग; शूटिंग दरम्यान घडला मोठा अपघात, नेमकं काय घडलं सांगत शेअर केला VIDEO
पुढे सरकार कशी मदत करू शकतं याविषयी सांगत वैशाली सामंत म्हणाली, "सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्याला हवे त्यांचा संपूर्ण आढावा देखिल घ्यावा. आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे. आता आपलं Competition हे मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवं. आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे." आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल हे पाहणं गरजेच आहे.