Saisha Bhoir Quits Serial: छोट्या पडद्यावरील 'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) मालिकेतून घराघरात पोहोचलेली बाल कलाकार साईशा भोईरला (Saisha Bhoir) सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. साईशाची आई पूजा भोईर (Pooja Bhoir) हिच्यावर झालेल्या फसवणूकीच्या आरोपांमुळं साईशा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत ती चिंगीची भूमिका साकारत होती. मात्र, आता साईशाने मालिका सोडली आहे. साईशाच्या जागी आता चिंगीची भूमिका नवी बालकलाकार साकारणार आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईशाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. 'नवा गडी नवं राज्य'मध्ये ती चिंगी ही व्यक्तीरेखा साकारत होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीसही पडत होती. मात्र, अचानक तिने या मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. साईशाच्या जागी आता आरोही सांबरे ही दिसणार आहे. मालिकेच्या एका प्रोमोतही ती दिसत आहे. 


'नवा गडी नवं राज्य' या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या प्रोमोमध्ये आरोहीची एक झलक पाहायला मिळत आहे. आरोहीने याआधी 'मुलगी झाली हो' या मालिकेत गोजिरी आणि 'शुभविवाह' या मालिकेत भूमी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. आरोही सांबरेचे इन्स्टाग्रामवर जवळपास सहा हजार फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावर आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. आता ती झी मराठीवरील मालिकेत नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.  मात्र, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना साईशाने मालिका का सोडली?, हा प्रश्न मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. साईशा किंवा तिच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये.


साईशाची आई चौकशीच्या फेऱ्यात


साईशाची आई पूजा भोईर हिच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल झाली आहे. पूजा भोईरने 16 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानुसार पोलिसांनी तिला अटक केली आहे. तसंच, साईशाच्या आई-वडिलांची मालमत्ताही जप्त करणार असल्याचे म्हटले जात आहे. पूजाविरोधात सगळ्यात आधी शैक्षणिक संचालकानं आणि त्यांच्या पत्नीन तक्रार नोंदवली होती. 


दरम्यान, साईशाच्या कामावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं तिच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होतं. साईशाच्या आईला अटक झाल्याचे खरं आहे पण त्याचा तिच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. ती अजून लहान असून तिला घरात काय सुरू आहे, याबाबत माहिती नाहीये. तिचं शूटिंग सुरु आहे. सेटवरही बोलणं टाळतोय, असं तिच्या एका जवळच्या नातेवाईकांनी म्हटलं होतं. मात्र, असं असतानाही साईशाने मालिका का सोडली, याची चर्चा रंगली आहे. 


'नवा गडी नवं राज्य'मध्ये अभिनेता कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील आणि अनिता दाते परुळेकर हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत. ही मालिका रंजक वळणावर असून आरोहीला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.