#पुन्हानिवडणूक? वादाला तोंड फोडणारा `धुरळा`
सोशल मीडिया अकाऊंटवरुन #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग पोस्ट केला होता.
मुंबई : सोशल मीडियावर नेहमी काहीतरी नवीन ट्रेंड होत असतं. त्यामुळे अनेकदा समाजात गैरसमज देखील उद्भवतात. असाच प्रकार घडला तो म्हणजे #पुन्हानिवडणूक या एका शब्दामुळे. मराठी कलाकारांमध्ये हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे. राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रश्नावरून #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू असल्याचा अनेकांचा समज झाला होता.
परंतु #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग कोणत्याही राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नसून एका चित्रपटाची टॅगलाईन आहे. दिग्दर्शक समीर विव्दांस यांच्या 'धुरळा' चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ३ जानेवारी २०२० रोजी 'धुरळा' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
#पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू झाल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी थेट मराठी कलाकारांचा विरोध केला. अशा प्रकारे ट्विट करत जनतेची दिशाभूल करत त्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
काही मराठी अभिनेत्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग पोस्ट केला होता. सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर ही त्यापैकी काही कलाकारांची नाव.