तीस वर्षांनंतरही ‘धनंजय माने’ इथेच...
अफलातून कलाकार, तितकंच विनोदी कथानक अशी सुरेख घडी बसल्यामुळे ही ‘बनवाबनवी…’ चांगलीच मुरली
मुंबई: काही चित्रपट आणि त्यात सहभागी होणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर अशी काही छाप पाडतात की अनेक वर्षे उलटूनही त्यांची जादू कायम पाहायला मिळते. अशा या चित्रपटांच्या यादीतील एक नाव म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. आजच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीस वर्षांचा काळ लोटला आहे. मराठी कलाविश्वात विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या आणि असंख्या सिनेरसिकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाविषयी सांगावं आणि बोलावं तितकं कमीच.
सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा अभिनय पाहायला मिळाला होता.
अफलातून कलाकार, तितकंच विनोदी कथानक अशी सुरेख घडी बसल्यामुळे ही ‘बनवाबनवी…’ चांगलीच मुरली असं म्हणायला हरकत नाही. त्याचच उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ...
चित्रपट प्रदर्शित होऊन आज तीस वर्षे उलटली असली तरीही त्यातील अनेक दृश्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. मग ते धनंजय मानेने (अशोक सराफ यांनी) दुधाच्या केंद्रावर रांगेत उभं राहून चक्कर आल्याचं नाटक करणं असो किंवा, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, असं विचारणारा लक्ष्या असो. प्रासंगिक विनोद आणि त्यातून पुढे जाणारा चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’चा जीव.
मुख्य म्हणजे सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी चित्रपटात जे स्त्रीरुप घेतलं होतं, ते पाहता आजही तशी पात्र पुन्हा होणे नाही, अशीच प्रतिक्रिया अनेकजण देतात. असा हा चित्रपट किंबहुना 'अशी ही बनवाबनवी' खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट विश्वाच्या इतिहासात एक महत्त्वाचं पान जोडणारी ठरली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.