थिएटर गाजवलेला `बाईपण भारी देवा` आता टिव्हीवर, `या` तारखेला होणार प्रीमियर
चित्रपटगृह गाजवणारा `बाईपण भारी देवा` हा चित्रपट टेलिव्हिजनवर कधी पाहायला मिळणार, याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.
Baipan Bhaari Deva on Television : कोरोना काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणून 'बाईपण भारी देवा'कडे पाहिले जाते. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटाचे सर्वच शो हाऊसफुल झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 9 महिने उलटले आहेत, तरीही अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. अनेक चित्रपटगृह गाजवणारा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट टेलिव्हिजनवर कधी पाहायला मिळणार, याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.
बाईपण भारी देवा चित्रपटाने 2023 हे वर्ष चांगलंच गाजवलं. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिलं. मंगळागौर स्पर्धा जिंकण्यासाठी सहा बहिणींची होणारी तारेवरची कसरत आणि ही कसरत करता करता बहिणींमधलं खुलत जाणारं नातं असे या चित्रपटाचे कथानक होते. या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरली होती.
स्टार प्रवाहवर वाहिनीवर पाहता येणार
आता लवकरच हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 19 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी असलेल्या स्टार प्रवाहवर हा चित्रपट पाहता येणार आहे.
'बाईपण भारी देवा' हा चित्रपट 20 जानेवारी 2024 रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला. डिझ्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे मराठीसोबतच हिंदीमध्येही हॉटस्टारवर हा चित्रटप प्रदर्शित झाला. त्यामुळे अनेक मराठी रसिकांसह हिंदी भाषिकांनीही हा चित्रपट पाहिला.
76.05 कोटींची कमाई
दरम्यान 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टंगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या. या चित्रपटाच्या कथेचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होते. तर याची निर्मिती माधुरी भोसले यांनी केली होती. हा चित्रपट 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 76.05 कोटींची कमाई केली होती.