मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे बऱ्याच चेहऱ्यांनी प्रेक्षकांच्या मनात आणि त्यांच्या घरातही स्थान मिळवलं. याच मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला एक चेहरा म्हणजे 'शनाया' साकारणाऱ्या अभिनेत्री रसिका सुनील हिचा. 'ए गॅरी.....', असं म्हणत 'गुरूनाथ सुभेदार'च्या मागेपुढे घिरट्या घालणाऱ्या 'शनाया'चं पात्र रसिकाने साकारलं होतं. मालिकेमुळे लोकप्रियतेच्या ऐन शिखरावर असतानाच रसिकाने उच्च शिक्षण घेण्याच्या कारणास्तव मालिकेतून काढता पाय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशात शिक्षण घेणार असल्याचं सांगत तिने प्रेक्षकांचा तात्पुरता निरोप घेतला. मालिकेतून ही 'शनाया' अर्थात रसिका प्रेक्षकाच्या भेटीला येत नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती सर्वांच्याच संपर्कात आहे. मुख्य म्हणजे अभिनय, गायन अशा क्षेत्रांमध्ये सक्रिय असणारी ही रसिका आता चक्क विमान उडवायचे धडे गिरवतेय. बसला ना धक्का? खुद्द रसिकानेच इन्स्टाग्रामवर याविषयीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती चक्क विमान उडवताना दिसत आहे.


'हो... तुम्ही पाहताय हे खंर आहे. मी विमान उडवलं आहे', असं तिने कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. विमान उडवल्याचा आनंद तिने कॅप्शनच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. उंचीवरून, आकाशातून हे जग अदभूत दिसतं, तुम्ही जितके उंचांवर जाता तितकंच जबाबदारही व्हावं लागतं, असं म्हणत रसिकाने तिच्या या नव्या इनिंगविषयी माहिती दिली. उच्च शिक्षणाचे धडे गिरवता गिरवता रसिकाची ही कामगिरी प्रशंसनीय ठरत असून, फक्त अभिनयच नव्हे तर इतरही काही क्षेत्रांमध्ये ती कौशल्य संपादन करत असल्याचं स्पष्ट होत आहे. 



रसिकाच्या लोकप्रियतेविषयी सांगावं तर, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या निमित्ताने शनाया याच नावाने ती ओळखली जाऊ लागली होती. खोडकरपणा आणि निरागसता हे दोन घटक तिने सकारलेल्या पात्रातील महत्त्वाचे निकष ठरले. आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला तिने उत्तमरित्या न्याय दिला होता हे प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या तिच्या प्रसिद्धीवरुनच लक्षात आलं होतं.