Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan : मराठी संगीत विश्वातील लाडकी जोडी म्हणून प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्याकडे पाहिले जाते. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा या दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी मुग्धाने मुंबई विद्यापीठाच्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत सुवर्ण पदक मिळाले. यानंतर आता पुन्हा एकदा प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनच्या आयुष्यात आनंदाचा प्रसंग आल्याचे पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. ते दोघेही चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडींबद्दल पोस्ट करत सांगत असतात. आता प्रथमेशने लग्नानंतर घडलेल्या एका आनंदाच्या प्रसंगाबद्दल सांगितले आहे. प्रथमेश आणि मुग्धा या दोघांनी जोड्याने श्री नृसिंहवाडी येथे श्रीदत्त महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्याने मुग्धासोबतचे काही खास फोटोही पोस्ट केले आहेत. 


प्रथमेश लघाटे काय म्हणाला?


"आजि आनंद आनंद | मनी भरला पूर्णानंद | वाचे बोलता तो न ये | बुद्धिबोध बोध स्तब्ध राहे ॥ परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पदसंग्रहातील या ओळींची प्रत्यक्ष अनुभूती मागच्या आठवड्यात आली. सांगलीला चितळे बंधू यांच्या सुरश्री संगीत महोत्सवात माझं आणि मुग्धाचं गाणं होतं. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या प्रचंड लाडक्या श्रद्धास्थानापैकी एक श्री नृसिंहवाडी येथे श्रीदत्त महाराजांच्या कृपेने लग्नानंतर प्रथमच दर्शनाचा योग आला. 


नेहमीप्रमाणेच दक्षिणद्वाराशी गायनसेवाही झाली. अतिशय प्रसन्न वातावरणात अप्रतिम दर्शन घडलं. दक्षिणद्वाराशी गायनसेवा झाल्यावर डोळे उघडताच समोर श्री संकेश्वर पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचं दर्शन झालं. हा दुग्ध शर्करा योगच!! त्याच दिवशी संध्याकाळी आयुष्यात पहिल्यांदा श्री क्षेत्र औदुंबर येथे जाऊन दर्शनाचा आणि तिथेही महाराजांसमोर बसून गायनसेवेचा योग आला. महाराजांना गायनसेवा अतिप्रिय आहे आणि महाराज ही सेवा नेहमी आमच्याकडून करुन घेतात हे आमचं परमभाग्य आहे. एकाच दिवशी श्री मनोहर पादुका आणि श्री विमल पादुकांच्या दर्शनाचा लाभ होणं व दोन्ही स्थानी महाराजांजवळ बसून गायनसेवा करायला मिळणं हे श्री महाराजांच्या कृपेशिवाय शक्यच नाही. याच प्रसंगीचे काही फोटो आपल्याशी शेयर करतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", असे प्रथमेश लघाटने म्हटले आहे. 



प्रथमेश लघाटेच्या या पोस्टवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी फारच छान अशी कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. 'असेच आनंदी राहा, श्री गुरुदेव दत्त', अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर एकाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, असे म्हटले आहे. 


दरम्यान, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी 21 डिसेंबर 2023 ला लग्नगाठ बांधली. या दोघांनी पारंपारिक पद्धतीने आणि अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केले. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही सोशल मीडिया फारच सक्रीय असतात. त्या दोघांनीही “आमचं ठरलं!” असं लिहित त्यांचं नातं जगासमोर आणलं होतं.