Satish Joshi Passed Away : मराठी नाट्य तसेच सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन झालं आहे. त्यांनी रंगभूमीवरच अखेरचा श्वास घेतला. रंगोत्सवात स्टेजवरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त त्यांचे मित्र आणि अभिनेते राजेश देशपांडे यांनी दिले आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडिया या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाचे आयोजन गिरगावमधील ब्राह्मण सभा या नाट्यगृहात करण्यात आले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सृजनोस्तव या रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरु होता. याचवेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्राणज्योत मालवली. 


राजेश देशपांडे यांनी दिली माहिती


सतीश जोशी यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सतीश जोशी यांचे निधन झाल्याचे सांगितले आहे. "आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश  जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले.  जाण्यापूर्वी  त्यानी अभिनय पण केला होता  ओम शांती ओम. सृजन द creation च्या कार्यक्रमात घडलेली ही घटना नाही ह्याची कृपया नोंद माध्यम प्रतिनिधींनी घ्यावी..कारण तशी बातमी कुणीतरी प्रसिद्ध केली आहे. आज 11 वाजता मध्यांदिन ब्राह्मण सभा येथे गिरगाव रंगभूमी वर एक छोटा प्रवेश सादर केला.त्या नंतर अस्वस्थ झाले.आणि लगेच हरकिसन दास हॉस्पिटल ल आणले.थोड्याच वेळात प्राणज्योत मालवली", असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 



सतीश जोशी यांचा अल्पपरिचय


सतीश जोशी यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. झी मराठीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली. ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेत ते शेवटचे झळकले होतं. त्यासोबतच त्याने अनेक नाटकांमधून आणि चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. सतीश जोशी हे मालिकांमधून घराघरात पोहोचले. 


दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्या बहुतेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. साहित्य संघाच्या मच्छकटिका नाटकातून काम केले होते. रंगभूमीवरील हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांना ओळखले जायचं. सतीश जोशींच्या निधनाची बातमी कळताच सिनेसृष्टीतील कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आहे.