अमेरिकेतील प्रसिद्ध सिटकॉम फ्रेंड्समधील (Friends) अभिनेता मॅथ्यू पेरीच्या (Matthew Perry) निधनासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. केटामाइनच्या अतीसेवनामुळे मॅथ्यू पेरीचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनातून उघड झालं आहे. यासह मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचा तपास संपला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 90 च्या दशकातील कार्यक्रम 'फ्रेंड्स'मध्ये चँडलर बिंगच्या (Chandler Bing) भूमिकेमुळे तो स्टार झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

28 ऑक्टोबरला मॅथ्यू पेरीचं निधन झालं. लॉस एंजेलिसमधील घराच्या स्विमिंग पूलमध्ये तो बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदनात समोर आलं आहे की, केटामाइनसह इतर गोष्टींमुळे त्याची शुद्ध हरपली होती आणि तो स्विमिंग पूलमधील पाण्यात बुडाला. केटामाइन हे एक शक्तिशाली औषध आहे जे सामान्यतः चिंता आणि नैराश्याच्या प्रायोगिक उपचारांमध्ये वापरलं जातं. 


शवविच्छेदन रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, मॅथ्यू पेरी केटामाइन इन्फ्युजन थेरपी घेत होता, जे उदासीनता आणि चिंता यावरील उपचारांसाठी होते. त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये केटामाइनचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं आहे. 


शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केला होता हॉट टबचा फोटो


मॅथ्यूच्या निधनानंतर इंस्टाग्रामवरील त्याची शेवटची पोस्ट चर्चेत होती. याचं कारण या पोस्टमध्ये त्याने त्याच हॉट टबचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये बुडून त्याचं निधन झालं. "ओह, इतकं कोमट पाणी, आजूबाजूला फिरताना बरं वाटतं? असं त्याने फोटो पोस्ट करताना लिहिलं होतं. फोटोमध्ये मॅथ्यू पाण्यात बसलेला असून, मागे निरभ्र आकाश दिसत आहे. दुर्दैवाने ही त्याची शेवटची पोस्ट आणि शेवटचा फोटो ठरला होता.



कोण आहे मॅथ्यू पेरी?


मॅथ्यू पेरीचा जन्म 19 ऑगस्ट 1969 रोजी अमेरिकेत झाला. मॅथ्यूने करिअरच्या सुरुवातीला अनेक छोट्या भूमिका केल्या. 1987 ते 1988 पर्यंत 'ब्वॉइज विल बी ब्वॉइज' शोमध्ये चैज रसेली त्याची भूमिका प्रसिद्ध झाली होती. पण फ्रेंड्स मालिकेने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. आजही लोक त्याला त्याच मालिकेसाठी ओळखतात. 


फ्रेंड्स सीरीज 22 सप्टेंबर 1994 ला सुरु झाली होती. 6 मे 2004 रोजी मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला होता. 236 एपिसोड्सची सीरिज प्रत्येक अवॉर्ड आपल्या नावावर करत होती. 


ड्रग्जचं व्यसन आणि तणावामुळे करिअरला ब्रेक


1994 ते 1998 दरम्यान मॅथ्यू पेरी करिअरमधील सर्वोच्च स्थानावर असतानाच ड्रग्जच्या आहारी गेला होता. यादरम्यान त्याचं वजन वेगाने कमी होत होतं. अनेकदा तर त्याला पुनर्वसन केंद्रात दाखल करावं लागलं होतं अशी कबुली त्याने फ्रेंड्सच्या रियुनिअनमध्ये दिली होती. मला मद्यपान आणि ड्रग्जचं प्रचंड व्यसन असून, मी त्यातून बाहेर पडू शकलो नाही असं त्याने सांगितलं होतं.