माझा होशील ना : मेघना आदित्यशी ठरलेला साखरपुडा मोडणार
मालिकेत नवं वळण
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' (Maza Hoshil Na) प्रेक्षकांच्या पसंतीला येत आहे. या मालिकेतील आदित्य आणि सई ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडत असली तरीही मालिकेत हे दोघं एकमेकांनापासून लांब आहेत. सई आपला साखरपुडा मोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. असं असताना मेघना आदित्य-सईला एकत्र येऊ देत नाही. यामुळे प्रेक्षकांना माझा होशील ना मालिकेतल्या मेघनाचा खूप राग येऊ लागला आहे.
आदित्य आणि सईच्या प्रेमात तिची ढवळाढवळ खूप वाढत गेलीये आणि ती आदित्यशी थेट साखरपुडा उरकायला आलीये. ह्याबद्दल प्रेक्षक मेघनाच्या वागणूकीवर नाराज आहेत. सई-आदित्यला वेगळं करायला आतूर झालेल्या मेघनाला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय, पण अश्यातच आता माझा होशील ना मालिकेत अनपेक्षीत वळण येणार असून मेघना आदित्यशी ठरलेला साखरपुडा मोडणार आहे.
त्याचं कारण काय? खरंच ती आदित्यचा नाद सोडून देणार? की ही तिची काही नवीन खेळी असणार? हे अजून गुलदस्त्यातच आहे. ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी बघावा लागेल, २६ जानेवारीचा “माझा होशील ना” मालिकेचा विशेष भाग.